काम मिळवून देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन तरुणीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार करणाऱ्या अट्टल गुन्हेगारास राजारामपुरी पोलीसांनी शुक्रवारी अटक केली. अमित मिच्छद्र वाघेला (वय ३६, रा. पाडळकर वसाहत, संभाजीनगर) असे संशयिताचे नाव आहे. बुधवारी सायंकाळी हा प्रकार घडला होता. पीडित युवतीच्या आईने याबाबतची फिर्याद राजारामपुरी पोलीस ठाण्यात दिली होती.
अमित वाघेला गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे. त्याच्यावर जुना राजवाडा पोलीस ठाण्यात घरफोडी, चोरी असे विविध दहा गुन्हे दाखल आहेत. त्याच्या या कारनाम्यांमुळेच त्याची पत्नी व मुलगी त्याला सोडून गेल्याचे पोलिसांनी सांगितले.
पीडित युवती अल्पवयीन असून ती रोजंदारीवर सफाईची कामे करते. संशयित अमित वाघेला यापूर्वी महापालिकेकडे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर ड्रेनेज सफाईची कामे करत होता. त्याचे राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणे-जाणे होते. पीडित मुलीबाबत त्याला थोडीफार माहिती होती. काम मिळवून देण्याच्या बहाण्याने अमित वाघेला याने तिच्याशी ९ मार्चला संपर्क साधला. पण मुलीने एकटी येण्यास नकार दिला. त्यामुळे तिच्यासोबत तिचा एक नातेवाईकही आला होता. पीडित मुलगी आणि तिच्या नातेवाइकास बुधवारी सायंकाळी सहाच्या सुमारास मोटारसायकलवरून मोरेवाडीच्या दिशेने नेले. या ठिकाणी एका अर्धवट बांधकामावर त्या नातेवाइकाला सोडले व त्या मुलीला घेऊन मोटरसायकलवरून पलायन केले. पीडित मुलगी रात्री उशिरापर्यंत घरी न परतल्याने तिच्या आईने राजारामपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. रात्री अकराच्या सुमारास पीडित मुलगी मिळून आली. तिने पोलीस ठाण्यात येवून तिच्यावर अत्याचार झाल्याचे सांगितले. तसेच संबंधिताचे वर्णनही पोलिसांना सांगितले.
पीडित युवतीने अत्याचार करणारा तिच्या परिचयातील नव्हता. तिला नेमके कोणी बोलावून नेले याविषयी पुरक माहिती मिळत नसल्याने पोलिसांसमोर आव्हान होते. संशयित आरोपी मोरेवाडीच्या दिशेने गेल्याचे सांगितले होते. यामुळे पोलिसांनी या मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले होते. याआधारे पोलिसांनी आरोपीचा माग काढला. शुक्रवारी संशयित आरोपी अमित वाघेला सीपीआर परिसरात येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अमृत देशमुख यांना मिळाली होती. यानुसार सहायक फौजदार विजय कांबळे, सुनील देसाई, अमृता लाड यांनी सापळा रचून दुपारी तीनच्या सुमारास ताब्यात घेतले. त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
संग्रहित लेख, दिनांक 13th Mar 2016 रोजी प्रकाशित
तरुणीचे अपहरण, बलात्कार; अट्टल गुन्हेगारास अटक
काम मिळवून देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन तरुणीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार करणाऱ्या अट्टल गुन्हेगारास राजारामपुरी पोलीसांनी शुक्रवारी अटक केली.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 13-03-2016 at 02:40 IST
Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Criminal arrest in rape case