कोल्हापूर : गेले अनेक दिवस शहरवासीय पाण्यासाठी वणवण भटकत असताना कोल्हापूर महानगरपालिकेची यंत्रणा कुठल्याच बाबतीत सक्षम नाही. पाणीपुरवठा जीवनावश्यक बाब असूनही पाच – सहा दिवस नागरिकांना पाण्यापासून वंचित राहावे लागते. यातून महानगरपालिकेची यंत्रणा कुचकामी असल्याचे स्पष्ट होते, अशा शब्दांत राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष, आमदार राजेश क्षीरसागर यांनी कोल्हापूर महापालिकेच्या अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली.

कोल्हापूर शहरात ऐन गणेशोत्सवात आठवडाभर पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. सणासुदीच्या काळात नागरिकांवर पाण्यासाठी पायपीट करण्याची वेळ आली आहे. या पार्श्वभूमीवर आमदार क्षीरसागर यांनी शिंगणापूर पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्याच्या अनुषंगाने या योजनेच्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. शहर पाणीपुरवठा यंत्रणेचा आढावा अधिकाऱ्यांकडून घेतला. जल अभियंता हर्षजित घाटगे यांनी आज रात्रीपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत करण्याची ग्वाही दिली.

काळम्मावाडी योजनेवर प्रश्नचिन्ह

कोट्यवधी रुपये खर्च करून काळम्मावाडी नळपाणी पुरवठा योजना १२ वर्षांनी सुरू झाली. पण, ही योजना असून अडचण नसून खोळंबा असा प्रकार वारंवार घडत आहे. आराखडा करताना भविष्यातील अडचणींचा विचार केला गेला नाही, असे म्हणत क्षीरसागर यांनी या योजनेच्या या योजनेवर प्रश्नचिन्ह लावले.

शिंगणापूर, बालिंगा, कळंबा या तिन्ही जुन्या पाणी पुरवठा योजना पर्यायी यंत्रणा म्हणून सज्ज करण्यासाठी प्रस्ताव सादर करा, अशा सक्त सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

आयुक्तांना परखड सूचना

आमदार क्षीरसागर यांनी आयुक्त के.मंजूलक्ष्मी यांच्याशी दूरध्वनी वरून संपर्क साधून पाणीपुरवठ्याच्या योजनांवर, तांत्रिक अडचणी तत्काळ सोडविण्यासाठी जबाबदार अधिकारी नियुक्त करा. महानगरपालिकेच्या आकृतिबंधात अधिकारी, कर्मचारी वाळवून प्रस्ताव सादर करा. शहरात अशी परिस्थिती पुन्हा उद्भवता कामा नये. त्यासाठी आवश्यक यंत्रणा सज्ज ठेवा, अशा परखड सूचना दिल्या.

 गेले अनेक दिवस शहरवासीय पाण्यासाठी वणवण भटकत असताना कोल्हापूर महानगरपालिकेची यंत्रणा कुठल्याच बाबतीत सक्षम नाही.अशा शब्दांत राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष, आमदार राजेश क्षीरसागर यांनी कोल्हापूर महापालिकेच्या अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली.