कोल्हापूर : सरकारी आणि निमसरकारी कर्मचाऱ्यांनी जुनी पेन्शन लागू करावी यासह अन्य मागण्यांसाठी आजपासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्धार केला आहे. आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी कोल्हापूर जिल्ह्यात ८० हजार सरकारी, निमसरकारी, महापालिका, नगरपालिका, शिक्षक आदी कर्मचारी सहभागी झाले असल्याचा दावा करण्यात आला. संपाला प्रतिसाद मिळाल्याने शासकीय कार्यालय अधिकारी, कर्मचाऱ्यांअभावी कार्यालये ओस पडली आहेत. अत्यावश्यक सेवा सुरू आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जुनी पेन्शन लागू करावी, यासह अन्य मागण्यांसाठी राज्य कर्मचाऱ्यांनी संपावर जाण्याची भूमिका घेतली आहे. यामध्ये सरकारी, निमसरकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, महापालिका, नगरपालिका कर्मचारी संपावर उतरलेले आहेत. राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघ, शिक्षक भारती, महाराष्ट्र शिक्षक सेना, शिक्षक परिषद, राज्य खाजगी माध्यमिक व माध्यमिक शिक्षण संघ या संघटना सहभागी झाल्या आहेत.

हेही वाचा – ईडीच्या कारवाईनंतर हसनमुश्रीफ कागलमध्ये दाखल; ईडी कार्यालयात उपस्थित राहण्यासाठी मागितली महिन्याची मुदत

इशाऱ्याकडे दुर्लक्ष

आंदोलनात उतरणाऱ्या कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा दिला होता. मात्र त्याकडे कोल्हापूर जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांनी दुर्लक्ष केले असल्याचे आजच्या प्रतिसादावरून दिसत आहे. सकाळी दहा वाजता शासकीय कार्यालये उघडलीत. मात्र तेथे अधिकारी, कर्मचारी उपस्थित नव्हते. संपाला प्रतिसाद मिळणार हे लक्षात घेऊन लोकांनी शासकीय कार्यालयाकडे जाण्याचे टाळले. यामुळे नेहमी गजबजलेली शासकीय कार्यालये आज सुनीसुनी दिसत होती.

हेही वाचा – ओंजळभर फुले द्या, साखरेची माळ घेऊन जा; कोल्हापुरात निसर्ग मित्र संस्थेची गुढीपाडव्यासाठी मोहीम

सभा, रॅलीचे आयोजन

सकाळी ११ वाजता टाऊन हॉल बाग येथे सरकारी कर्मचारी जमणार आहेत. तेथे सभा होणार आहे. त्यानंतर शहरात मुख्य मार्गाने रॅली निघणार आहे. संपात ८० हजार कर्मचारी सहभागी झाले आहेत, असे राज्य सरकारी कर्मचारी समन्वय समितीचे जिल्हा अध्यक्ष अनिल लवेकर यांनी सांगितले.

शासकीय कार्यालयांमध्ये वर्ग एक व वर्ग २ चे अधिकारी उपस्थित होते. मात्र ही संख्या मोजकी आहे. कनिष्ठ अधिकारी व अन्य कर्मचारी यांनी संपामुळे कार्यालयाकडे फिरकण्याचे टाळले.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Govt employees strike for old pension scheme started in kolhapur ssb