कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेतील १०० कोटीचा रस्ते प्रकल्प रोज नवनवीन वादाची वळणे घेत आहे. या रखडलेल्या प्रकल्पावरून मंगळवारी शिवसेनेने पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना टीकेचे लक्ष्य केले आहे. पालकमंत्री आम्हा कोल्हापूरकरांना फसवत आहात. तुम्ही माफी मागा, अशी मागणी शिवसेनेचे उपनेते संजय पवार, जिल्हाप्रमुख विजय देवणे यांनी पत्रकाद्वारे केली आहे.

कोल्हापुरातील रस्ते खराब झाले आहेत. या रस्त्यावरून मार्ग काढणे ही वाहनधारक, पादचारी यांना कसरत ठरली आहे. शहरातील रस्त्यांमध्ये सुधारणा व्हावी यासाठी शंभर कोटीचा रस्ते प्रकल्प मंजूर झाला आहे. पण तो लोकप्रतिनिधी – अधिकारी यांच्यातील टक्केवारी प्रकरणावरून रखडला असल्याचा आरोप जाहीरपणे होऊ लागला आहे. यावरून कालच कोल्हापूर नागरी कृती समितीने आंदोलन केले होते. शहरातील मुख्य पाच रस्ते कामे पूर्ण न झाल्यास न झाल्यास त्यांनी प्रशासक तथा आयुक्त के. मंजू लक्ष्मी व नगर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांना घेराव घालण्याचा इशारा दिला आहे. या पाठोपाठ आता या रखडलेल्या कामाविरोधात शिवसेनेने आवाज उठवलेला आहे.

हेही वाचा – कोल्हापूर : विधवा-विधुरांच्या पाद्यपुजनाने गृहप्रवेश; सोनाळीतील सेवानिवृत्त मुख्याध्यापकांचे पुरोगामी पाऊल

नियम धाब्यावर बसवून ठेकेदार नियुक्ती

या पत्रकामध्ये संजय पवार व विजय देवणे यांनी म्हटले आहे की, कोल्हापूर शहरातील रस्त्यांसाठी शासनाने जनतेच्या करातून मिळणाऱ्या निधीतून कोल्हापूर शहरातील रस्ते गुळगुळीत व दर्जेदार व्हावेत म्हणून १०० कोटी रुपयांचा निधी वर्ग केला. ही सर्व रस्ते निविदेची वादग्रस्त प्रक्रिया कशीबशी लवकरात लवकर पार पाडून, नियम धाब्यावर बसवून ठेकेदार निश्चित करण्यात आला.

पालकमंत्रीच जबाबदार

मिरजकर तिकटी येथे ५ महिन्यांपूर्वी पालकमंत्र्यांनी मोठा गाजावाजा करत १०० कोटी रुपयांच्या रस्त्यांचा शुभारंभ करत कोल्हापूरकरांसाठी दर्जेदार व गुळगुळीत रस्ते देण्याची भिमगर्जना केली होती. पण आजतागायत कोल्हापूरकरांचा खड्ड्यातून प्रवास करण्याचा वनवास संपला नाही. याला पूर्णपणे नियोजनशुन्य व निष्क्रिय कोल्हापूर महापालिका प्रशासनाबरोबरच पालकमंत्रीसुद्धा जबाबदार आहेत, असा आरोप पवार, देवणे यांनी केला आहे.

गडबडीत शुभारंभ कशासाठी?

पालकमंत्र्यांनी कोल्हापूर शहरवासीयांना स्पष्टीकरण द्यावे की, आपण रस्ते कामाचा शुभारंभ करण्याचा आट्टाहास कोणाच्या हाट्टापायी, कशासाठी केला? जर का रस्ते करण्यापूर्वीची महापालिकेची उपाययोजनाच तयार नव्हती. तर मग ऐवढ्या गडबडीत शुभारंभ कशासाठी व कोणाला खुष करण्यासाठी केला? भविष्यात आपले सरकार पडेल आणि आपल्या व आपल्या सरकारमधील सहकाऱ्याच्या हातून ठेकेदाराकडून सर्व काही मिळणारा मानसन्मान मिळणार नाही, या भितीपोटी आपण शुभारंभ केला का? असा प्रश्न शिवसेनेने पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना उद्देशून केला आहे.

हेही वाचा – कोल्हापुरात संभाजी महाराज जयंती सोहळ्यात १२ तास लाठीकाठीचा उपक्रम

महापालिकेविरोधात आंदोलन

वरील सर्वबाबी लक्षात घेता निष्क्रिय व नियोजनशून्य प्रशासनाच्या व सरकारच्या विरोधात शिवसेनेच्यावतीने लवकरच हल्लाबोल आंदोलन करण्यात येईल, असा विचार आहे या पत्रकांद्वारे संजय पवार विजय देवणे यांनी दिला आहे.