करवीर तालुक्यातील वरणगे पाडळी येथील एका व्यक्तीचा मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. पण या व्यक्तीचा मृतदेह पाठवण्याऐवजी दुसराच मृतदेह पाठवल्याने गुरुवारी नातेवाईकांना नसता मनस्ताप सहन करावा लागला. या प्रकरणी नातेवाईक, ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला. मृतदेह पुन्हा मुबंईला पाठवला असून हिंदुजा रुग्णालयाकडून मूळ मृतदेह कोल्हापूर कडे रवाना करण्यात आला असल्याचे रात्री सांगण्यात आले.

याबाबतची माहिती अशी की, वरणगे पाडळी येथील कृष्णात महादेव पाटील यांच्यावर मुंबई येथील हिंदुजा रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांचा आज पहाटे मृत्यू झाला. मुंबई येथील हिंदुजा रुग्णालयातील प्रशासनाने त्यांचा मृतदेह देण्या ऐवजी दुसऱ्याच व्यक्तीचा मृतदेह कापडात बांधून नातेवाईकांच्या ताब्यात दिला.  

हेही वाचा >>>‘तुलना कुणाशी करायची, याचं भान…’, अजित पवारांच्या ‘त्या’ दाव्यानंतर जयंत पाटील यांचा टोला

नातेवाईक मृतदेह घेवून वरणगे पाडळी येथे आले. दुपारी पै-पाहुणे, सगेसोयरे, मित्र परिवार असे सगळे स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी जमा झाले. अंत्यविधी करताना तो मृतदेह कृष्णात पाटील यांचा नसून दुसऱ्याच व्यक्तीचा असल्याचे लक्षात त्यावर आल्यावर उपस्थितांना एकच धक्का बसला. रुग्णालय प्रशासनाच्या  हलगर्जीपणामुळे झालेल्या या प्रकाराबद्दल नातेवाईकांनी संताप व्यक्त केला.