कोल्हापूर : राजर्षी शाहू महाराज यांची जयंती आहे. छत्रपती शाहू महाराज जयंती दिवशी मिरवणूक काढली जाणार. ती तुम्ही रोखाताच कशी? अशा शब्दांत कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी बुधवारी प्रशासनाला खडे बोल सुनावले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियामध्ये चांगलाच व्हायरल होत आहे.
त्याचे असे झाले, हातकणंगले तालुक्यातील ग्रामीण भागातील तरुण आज पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना कागल येथील निवासस्थानी भेटले. या तरुणांना राजर्षी शाहू महाराज जयंती निमित्त मिरवणूक काढायची होती. त्यासाठी त्यांनी जय्यत तयारी केली होती. मिरवणूक काढण्यासाठी पोलीस प्रशासनाकडे अर्जही दिला होता. मात्र , त्यास परवानगी नाकारण्यात आली असल्याचे या कार्यकर्त्यांनी मंत्री मुश्रीफ यांना सांगितले.
त्यावर मुश्रीफ हे चांगलेच भडकले. त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना मोबाईलवर बोलून राजर्षी शाहू महाराजांची जयंती आहे. त्याची मिरवणूक निघणारच. त्याला परवानगी कशी काय नाकारता? असे केले तर सोडणार नाही. काय करायचं ते करून घ्या, अशा शब्दात त्या अधिकाऱ्याला खडसावले. शिवाय, मिरवणूक ही निघणारच असेही स्पष्ट केले. नंतर, या तरुणांकडे वळून हसन मुश्रीफ यांनी मिरवणूक काढा; काय होते ते पाहून घेतो, असे आश्वासित केले.
कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रशासनाला खडे बोल सुनावले. "छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त मिरवणूक काढली जाणार. ती तुम्ही रोखताच कशी?" अशा शब्दांत हसन मुश्रीफ यांनी प्रशासनाला सुनावले. pic.twitter.com/xr8sgaRKba
— LoksattaLive (@LoksattaLive) June 26, 2024
दरम्यान या तरुणांपैकीच कोणीतरी पालकमंत्री हसन मुश्रीफ हे अधिकाऱ्यांना खडसावत असतानाचे व्हिडिओ चित्रीकरण केली . व ते सोशल मीडिया वरून व्हायरल केले. मंत्री मुश्रीफ यांनी घेतलेल्या या भूमिकेवरून उलट सुलट मतांतरे व्यक्त होत आहेत.
© The Indian Express (P) Ltd