कोल्हापूर : छत्रपती शिवरायांच्या कारकिर्दीत अनन्यसाधारण महत्त्व असणाऱ्या पन्हाळा किल्ल्याचा जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश होणे अभिमानाची, सन्मानाची बाब आहे. यामुळे पन्हाळगडाची ओळख जगभर पोहोचेल, असे प्रतिपादन पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी शनिवारी केले.
जागतिक वारसास्थळांच्या यादीत पन्हाळा किल्ल्याचा समावेश झाल्याबद्दल जिल्ह्याचे पालकमंत्री आबिटकर यांनी आज पन्हाळा किल्ल्याला भेट देऊन किल्ल्यावर आनंदोत्सव साजरा केला. या वेळी आबिटकर यांनी गडावरील शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. शूरवीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या पुतळ्याला पुष्पहार केला. उपविभागीय अधिकारी समीर शिंगटे, तहसीलदार माधवी शिंदे, मुख्याधिकारी चेतनकुमार माळी, माजी नगराध्यक्ष आसिफ मोकाशी नागरिक उपस्थित होते.
पन्हाळगडचा विकास आराखडा
पन्हाळगडाचा विकास आराखडा राज्य, केंद्र सरकारला सादर करण्यात येईल. जिल्ह्यातील किल्ल्यांचे जतन, संवर्धन करून ते अधिक संरक्षित करण्यासाठी निधी देण्यत येईल. किल्ल्यांचा विकास साधताना स्थानिकांची अडचण होणार नाही, अशी ग्वाही आबिटकर यांनी दिली.
गडाच्या वैभवाचा प्रसार – जिल्हाधिकारी
जगभरातील पर्यटकांचे स्वागत करण्यासाठी, गडाचे वैभव सर्वदूर पोहोचवण्यासाठी सर्वजण प्रयत्न करूया, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले.