कर्जमाफीपेक्षा हमीभाव अनेकांना महत्त्वाचा
शेतकरी संपावरून राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले असताना गावोगावच्या वावरात याच मुद्दय़ाच्या चच्रेची मशागत सुरू आहे. कर्जमुक्ती, हमीभाव मिळाल्याशिवाय बळिराजाच्या जीवनात परिवर्तन घडून येणार नाही. असा म्हणणारा वर्ग एकीकडे आहे तर दुसरीकडे कर्जमाफीचा लाभ बडे बागायतदार, अपात्र शेतकऱ्यांना मिळू नये आणि शेतकऱ्यांच्या नावावर हेच राजकारण घुसले असून त्याला पायबंद घातला पाहिजे, अशी स्पष्ट भूमिका मांडली जात आहे.
आजरा येथील शेतकरी उद्धवराव माने यांनी संप योग्य असल्याचे मत मांडले. दूध ज्याप्रमाणे फॅटवर आधारित निश्चित दराने खरेदी केले जाते वा उसाला जशी एफआरपी मिळण्याची हमी असते तीच पद्धत अन्य पिकांनाही लागू करण्याची गरज आहे. शेती तोटय़ामध्ये जात असल्याने आणि उत्पादित पिकाला दर मिळत नसल्याने शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. त्याच्या डोक्यावरील कर्जाचा भार कमी केला नाही तर सावकारी कर्जाचा धोका आहे. संपामुळे शेतीमालाची नासधूस, दूध सांडून देणे असे प्रकार होत असले तरी काही दिवस असे नुकसान सोसले तरी भविष्यात शेतकऱ्यांना चांगले दिवस येणार आहेत, असे म्हणत त्यांनी शेतीचे समर्थन केले.
उच्चशिक्षित असलेल्या आणि वडिलांना शेतीकामासाठी मदत करणाऱ्या कविता रोटे यांनी शेतकऱ्यांच्या संपाच्या नावावर राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रकार सुरू असल्याचे निरीक्षण नोंदवून या विषयी नाराजी व्यक्त केली. रस्त्यावर शेतीमाल ओतण्याचे काम खरा शेतकरी करणार नाही. शेतकरी खराच इतका आक्रमक असता, तर त्याने आत्महत्येचा मार्ग पत्करला नसता. शेतीवरचा वाढणारा खर्च आटोक्यात आणण्यासाठी शासनाकडून आवश्यक त्या उपाययोजना करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
शेतकऱ्याची आíथक आवस्था अतिशय बिकट झाली आहे याकडे लक्ष वेधून हुपरीचे घनशाम आचार्य यांनी शेतकऱ्यांचा संप योग्य असल्याचे मत नोंदवले. बाजारातील अन्य वस्तूचे दर वाढत चालले असताना शेतीमालाला मात्र अपेक्षित दर मिळत नाही. १९७० साली १ टन ऊस कारखान्याला दिल्यावर मिळालेल्या रकमेतून १ तोळे सोने खरेदी करता येणे शक्य होते. आज मात्र या दोन्हीच्या दरातील अंतर खूपच वाढलेले आहे, असे त्यांनी निदर्शनास आणून दिले. ही स्थिती लक्षात घेता शेतीमालाला हमीभाव मिळण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
नसíगक शेती करणारे प्रमोद पाटील यांनी शेतकरी संपाच्या नावावर सुरू असणारी अन्नधान्याची नासाडी हा चुकीचा प्रकार असल्याचे सांगितले. शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली पाहिजे पण ती रास्त व गरजू शेतकऱ्यांच्याच पदरात पडली पाहिजे. पूर्वीच्या कर्जमाफीचा लाभ बडय़ा शेतकऱ्यांनी उचलला असल्याचे नमूद करून अशा प्रकाराला पायबंद घालण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
शेती व नोकरी या दोन्हीचा अनुभव जमेला असलेले सचिन जाधव यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी व हमीभाव मिळण्याची हीच वेळ असून याबाबत शासनाने तत्काळ निर्णय घेण्याची गरज व्यक्त केली. शेतकरी संपवून शहरी मध्यमवर्गीय व ग्रामीण भागातील शेतकरी यांच्यातील दरी वाढत चालल्याचा प्रकार सामाजिक चिंतनास कारणीभूत ठरत आहे. तोटय़ाचे गणित वाढत चालल्याने शेतकरी कर्जाच्या विळख्यात अडकला आहे. त्याला दिलासा देण्यासाठी कर्जमाफी द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.
