करवीरनिवासिनी महालक्ष्मी मंदिरापासून अवघ्या २०० मीटर अंतरावर रॉकेलचा टँकर भरला जात असल्याचा गंभीर प्रकार शुक्रवारी पुढे आला. मंदिराबाबत सुरक्षिततेचा प्रश्न सातत्याने चच्रेत असताना शेतकरी संघातून स्फोटक ठरू शकणाऱ्या रॉकेल भरण्याच्या प्रकाराची तक्रार प्रजासत्ताक सामाजिक संघटनेने मुंबई येथील दहशवादविरोधी पथकाकडे (एटीएस) केली आहे. यापूर्वी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार करूनही त्याची दखल न घेतल्याने या संघटनेला एटीएसकडे धाव घ्यावी लागली आहे.
करवीरनिवासिनी महालक्ष्मी मंदिराच्या सुरक्षिततेचा प्रश्न गेली काही वष्रे संवेदनशील बनला आहे. दहशतवाद्यांच्या हल्ल्यापासून ते किरकोळ स्वरूपाच्या घटनांवरून त्यांची चर्चाही होत असते. मंदिरापासून जवळच पूर्वेकडे शेतकरी संघाचा रॉकेल डेपो आहे. या डेपोमध्ये टँकरद्वारा रॉकेल पुरवले जाते. याबाबत सन २०१३मध्ये तक्रार करण्यात आल्यानंतर रॉकेलचा व्यवहार बंद करण्यात आला होता, मात्र अलीकडे तो पुन्हा सुरू करण्यात आला आहे. याबाबतही जिल्हा पोलीस प्रमुखांकडे प्रजासत्ताक संघटनेने तक्रार केली होती. मात्र पोलीस प्रशासनाने याची दखल घेतली नाही.
शुक्रवारी टँकरद्वारा रॉकेल पुरवठा करण्याचा प्रकार घडला. मंदिरापासून २०० फूट अंतरावर रॉकेल पुरवठा करण्याचा हा प्रकार सुरक्षाव्यवस्थेला आव्हान देणारा आहे. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीअंतर्गत येणाऱ्या महालक्ष्मी मंदिराचे अध्यक्षपद जिल्हाधिकाऱ्यांकडे आहे. तर संघाचा रॉकेल डेपो हा राजवाडा पोलीस ठाण्यासमोरच आहे. तरीही जिल्हाधिकारी आणि राजवाडा पोलीस या दोघांकडूनही रॉकेल पुरवठय़ाच्या प्रकाराकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे स्पष्ट झाले. गेल्या आठवडय़ात सन्यात दाखल होण्यासाठी आलेल्या परप्रांतीय व्यक्तीने मंदिराबाहेरील चप्पल स्टँड-साहित्य ठेवण्याच्या ठिकाणी आपली बॅग ठेवली होती. त्यानंतर ती व्यक्ती सुमारे तीन तास गायब होती तेव्हा बॉम्ब असल्याच्या समजातून बॅगेची तपासणी करण्याची वेळ सुरक्षा यंत्रणेवर आली होती. मंदिराच्या सुरक्षेबाबतचा हा अनुभव ताजा असतानाही रॉकेल पुरवठा करण्याच्या प्रकाराबाबत सुरक्षाव्यवस्था दुर्लक्ष करीत असल्याबाबत भाविकांतूनही संताप व्यक्त केला जात आहे.
मंदिरात येणाऱ्या भाविकांना चप्पल बाहेर ठेवणे, पिशवी वा अन्य साहित्य बाहेर ठेवण्यास भाग पाडणे अशा प्रकाराद्वारे सुरक्षेकडे लक्ष दिले जाते. बारीकसारीक प्रकारातून भाविकांना सुरक्षेच्या नावाखाली त्रास दिला जात असताना स्फोटक ठरू शकणाऱ्या रॉकेल पुरवठय़ाच्या व्यवहाराकडे दुर्लक्ष कसे केले जाते असा सवाल प्रजासत्ताक संघटनेचे अध्यक्ष दिलीप देसाई, सचिव बुऱ्हान नायकवडी यांनी शुक्रवारी उपस्थित केला. याबाबत एटीएस पथकाकडे त्यांनी छायाचित्रांसह वस्तुस्थितीची माहिती देऊन मंदिर व भाविकांच्या सुरक्षेबाबत काळजी घेण्याबाबत आवाहन केले आहे. यानिमित्ताने मंदिराच्या सुरक्षाव्यवस्थेबाबत नव्याने प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kerosene tanker is filled up to 200 meters from mahalaxmi temple