कोल्हापूर : वयाच्या ९५ व्या वर्षाकडे वाटचाल. तरीही सुस्पष्ट, खणखणीत आणि मुद्देसूद भाषण. हे होते माजी खासदार कल्लाप्पाण्ण आवाडे यांचे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षीय भाषणाचे ठसठशीत वैशिष्ट्य. भाषण इतके प्रभावी झाले की उपस्थितांनी या ‘युवा नेत्या’च्या भाषणाला उभे राहून टाळ्यांच्या गजरात प्रतिसाद नोंदवला.
हुपरी (ता. हातकणंगले) येथील उजाड माळरानावर १९९३ साली जवाहर साखर कारखान्याची उभारणी झाली. साखरवाडी येथील बंद पडलेला कारखाना माळावर केवळ आणलाच नाही तर तो आता राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे गाळप करणारा कारखाना ठरला आहे. यामागे कल्लाप्पाण्णा आवाडे यांचे अथक प्रयत्न कारणीभूत ठरले होते. त्यांच्या कार्याची नोंद घेऊन पुढे या कारखान्याचा कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखाना असा नामविस्तार करण्यात आला.
आवाडे यांनी सहकारात बँक, सूतगिरणी, कापड प्रक्रिया उद्योग अशा विविध प्रकारच्या संस्था निर्माण केल्या असल्या तरी त्यातील मैलाचा दगड ठरला तो जवाहर कारखाना. याचवेळी ते राजकीय पातळीवर नगरसेवक, इचलकरंजीचे नगराध्यक्ष, आमदार, उद्योग व नगरविकास राज्यमंत्री, दोन वेळा खासदार असा राजकीय प्रवासही करीत राहिले.
अलीकडे म्हणजे ९० च्या दशकानंतर ते राजकारणात असले तरी पूर्वी इतके सक्रिय नाहीत. हल्ली तर ते निमित्तमात्र भाषण करीत असतात. पण शनिवारी त्यांच्यात जीवापाड जपलेल्या जवाहर कारखान्याची वार्षिक सभा म्हटल्यावर वेगळेच चैतन्य प्राप्त झाले. गात्रे थकली असली तरी त्यांच्या बोलण्यातील जोम, उत्साह कायम होता. त्यांनी अध्यक्षीय भाषणात कारखान्याची निर्मिती, त्यातील अडचणी, त्यासाठी गावोगावी घेतलेल्या बैठका, शेअर संकलन, उभारणीचे टप्पे ते पुढे उपपदार्थ निर्मिती प्रकल्प तसेच शेतकरी, कामगार यांच्या हितासाठी केलेले प्रयत्न याचा परिपूर्ण आढावा घेतला.
मुळात त्यांनी बोलायला सुरुवात केली तेव्हाच अनेकांच्या डोळ्यात आश्चर्य होते. ९४ वर्षांचा एक नेता खणखणीतपणे भाषण करतो आहे, हेच मुळी सर्वांसाठी विस्मयकारक तितकेच कुतूहल जनक होते. उपस्थितांनी त्यांच्या भाषणातील शब्दनशब्द कानात प्राण आणून ऐकले. नाही म्हटले तरी त्यांच्या भाषणात एक- दोन संदर्भ मागे पुढे झाले. पण ते वगळता त्यांचे एकंदरीत भाषण खणखणीत असेच होते. त्यामुळे साहजिकच उपस्थितांनी टाळ्यांच्या गजर करीत या युवा नेत्याला अनोख्या स्वरूपात मानवंदना दिली.