कोल्हापूर : अतिक्रमण मुक्त विशाळगड मोहिमेला रविवारी हिंसक वळण लागले. प्रक्षुब्ध जमावाने दगडफेक, जाळपोळ केली. यामध्ये अनेक घरे, वाहने जळून खाक झाली. काहीजण जखमी झाले. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

किल्ले विशाळगड येथेअतिक्रमणे वाढली आहेत. ती हटवण्यासाठी हिंदुत्ववादी संघटनांनी गेल्या रविवारी महाआरती केली होती. तर या आठवड्यात माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी गेली दीड वर्ष शासन, प्रशासन याबाबत निष्क्रिय असल्याचा आरोप करून आज विशाळगड येथे येण्याचे आवाहन शिवप्रेमींना केले होते. ते स्वतः मोहिमेमध्ये सहभागी झाले होते. मुसळधार पाऊस असतानाही रात्रीपासूनच वेगवेगळ्या मार्गांनी शिवप्रेमी गडावर दाखल झाले होते.

हेही वाचा – पावसामुळे कोल्हापूरकरांचा सलग दुसरा रविवार घरात बसून; जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाची शक्यता

आज सकाळी गडावरील रहमान मलिक दर्ग्याजवळ जय श्रीरामाच्या घोषणा देत दगडफेकीचा प्रकार घडला. यामध्ये स्थानिकांसह एक पोलीस जखमी झाला. तर प्रतिहल्ला झाल्याचा आरोप शिवप्रेमींनी केला. याचे पडसाद गडाच्या पायथ्याला उमटले. या ठिकाणी जमलेले हजारो लोक आक्रमक झाले. संभाजीराजे छत्रपती यांचे गडाच्या पायथ्याशी आगमन झाल्यावर जय भवानी जय शिवाजी, विशाळगड अतिक्रमण मुक्त करा अशा घोषणा देण्यात आल्या. त्यांना गडावर जाण्यास प्रतिबंध करण्यात आला. त्यावर जमाव प्रक्षुब्ध झाला. हिंसक जमावाने भर पावसात एका घरात सिलेंडरचा स्फोट केला. कित्येक घरे पेटवून देण्यात आली. शेकडो दुचाकी, मोटारी यांची नासधूस करण्यात आली.

हेही वाचा – परकेपण पुरे आता शिवसैनिकांनाच उमेदवारी – भास्कर जाधव

जमावाला रोखण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला. यामध्ये हनुमंत वसंत जाधव शिराज अडसुळे, प्रसाद संतोष रोकडे, मयूर राजेवडे, धनश्री मोहरे आदी जखमी झाले आहेत. घटनास्थळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा पोलीस प्रमुख महेंद्र पंडित, प्रांताधिकारी समीर शिंगटे, तहसीलदार रामलिंग चव्हाण यांच्यासह बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kolhapur encroachment free vishalgad movement turned violent incidents of stone pelting arson ssb