कोल्हापूर : करवीर निवासिनी महालक्ष्मी मंदिरात कृत्रिम बुद्धिमत्तेवर (एआय) आधारित गर्दी नियंत्रण प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. यामुळे भाविकांना सुलभतेने दर्शन होत आहे, असे मत पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी येथे व्यक्त केले.

नवरात्रीच्या काळात महालक्ष्मी मंदिरात प्रथमच एआय आधारित गर्दी नियंत्रण आणि पाळत प्रणाली यशस्वीरीत्या कार्यान्वित करण्यात आली आहे. ही अत्याधुनिक प्रणाली ‘वेलोस समूह आणि आयआयटी मंडी’ यांच्या संयुक्त सहकार्याने विकसित करण्यात आली आहे. आज पालकमंत्री आबिटकर यांनी या प्रणालीची माहिती घेतली, यावेळी ते बोलत होते.

कोल्हापूरमध्ये ‘एआय’ तंत्रज्ञानाची पहिली पायरी असून, या प्रकल्पाला मोठे यश मिळाले आहे. पुढील काळात सर्व गर्दीशी संबंधित कार्यक्रमांमध्ये ही प्रणाली लागू करण्याचा मानस पालकमंत्री आबिटकर यांनी व्यक्त केला. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय बलुगडे, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नायकवडे उपस्थित होते. या प्रकल्पासाठी महालक्ष्मी मंदिर परिसरात व पोलीस अधीक्षक कार्यालय अशी दोन चलीत केंद्रे उभारण्यात आली आहेत.

गुन्हेगार ओळखले

महालक्ष्मी मंदिर केंद्रामध्ये गर्दीचे थेट निरीक्षण, दैनंदिन गर्दीचे मोजमाप व अंदाज, तसेच चेहरा ओळखद्वारे संशयित व्यक्तींची ओळख करण्यात आली आहे. आतापर्यंत पोलीस विभागाकडून उपलब्ध २०० चेहऱ्यांच्या डाट्यामधून (विदा) ११ गुन्हेगार संशयितांची ओळख पटविण्यात यश आले आहे. पोलीस अधीक्षक कार्यालयातील केंद्रात वाहतूक कोंडीचे विश्लेषण करण्यात येते.