कोल्हापूर : सन २०१५ पासून अनेक वेळा कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवीच्या मूर्तीचे संवर्धन करण्यात आले. या संवर्धनामुळे सातत्याने मूर्तीची स्थिती गंभीर होत आहे. यापूर्वी करण्यात आलेल्या संवर्धनातून काहीही साध्य होत नसतांना पुन्हा एकदा १४ आणि १५ एप्रिलला भारतीय पुरातत्व विभागाकडून श्री महालक्ष्मीदेवीच्या मूर्तीचे संवर्धन केले जाणार आहे. २०१५ मध्ये झालेल्या संवर्धनामुळे मूर्तीवर गंभीर परिणाम झाले आहेत, असा स्पष्ट अहवाल आहे. त्यामुळे आता जे संवर्धन होणार आहे; त्या संवर्धानामुळे मूर्तीची हानी झाली, तर त्याची नेमकी जबाबदारी निश्‍चित करणे आवश्यक आहे. ही जबाबदारी निश्‍चित होत नाही, तोपर्यंत संवर्धनास स्थगिती देण्यात यावी. याअगोदर ज्यांच्यामुळे मूर्तीची हानी झाली त्या सर्व संबंधितांवर गुन्हे नोंद करावेत, तसेच मूर्तीचा मुद्दा हा धार्मिक मुद्दा असल्याने त्या संदर्भात संत, धर्माचार्य, शंकराचार्यांचे विविध पीठ आदींचे मार्गदर्शन घ्यावे, या मागणीचे निवेदन महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने जिल्हाधिकारी तथा पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष अमोल येडगे यांना शनिवारी देण्यात आले. या प्रसंगी श्री एकमुखी दत्त मंदिराचे मठाधिपती संतोष गोसावी, अखिल भारत हिंदू महासभेचे जिल्हाध्यक्ष संदीप सासणे, अंबाबाई भक्त समितीचे प्रमोद सावंत, हिंदु जनजागृती समितीचे किरण दुसे, शिवानंद स्वामी हे उपस्थित होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : कोल्हापूरच्या आखाड्यात दत्तक प्रकरण तापणार ?

हिंदु जनजागृती समितीने मोठ्या प्रमाणात विरोध केल्यानंतरही वर्ष २०१५ मध्ये श्री महालक्ष्मीदेवीच्या मूर्तीचे रासायिक संवर्धन करण्यात आले. पुरातत्व विभागाने केलेल्या रासायनिक प्रक्रियेतील फोलपणा वर्ष २०१७ मध्येच दिसण्यास प्रारंभ झाला आणि मूर्तीवर पांढरे डाग दिसू लागले. त्या वेळीही परत एकदा रासायनिक प्रक्रिया करण्यात आली. नुकतेच पुरातत्त्व खात्याचे निवृत्त अधिकारी आर्. एस्. त्र्यंबके आणि विलास मांगीराज यांनी मूर्तीच्या संदर्भात न्यायालयात सादर केलेल्या अहवालात श्री महालक्ष्मीदेवीच्या मूर्तीची गळ्याखालच्या भागाची झीज झाली असून ती झीज २०१५ या वर्षी झालेल्या रासायनिक संवर्धनातील अवशेषांची आहे, असे नमूद केले आहे.

हेही वाचा : “कोल्हापूरात व्यक्तीला विरोध करताना…,” किरण मानेंचा संताप; म्हणाले, “…तर मी उदयनराजेंना मत देणार नाही”

वर्ष २०१५ मध्ये जेव्हा रासायनिक संवर्धन करण्यात आले तेव्हा मूर्तीच्या रासायनिक संवर्धनानंतर मूर्तीच्या स्थितीस प्रक्रिया करणारे पुरातत्त्व खाते सर्वस्वी जबाबदार असेल, असे माननीय जिल्हाधिकार्‍यांनी त्या वेळी सांगितले. असे असतांना ९ वर्षानंतरही मूर्तीच्या स्थितीस जे जबाबदार आहेत त्यांच्यावर अद्याप कारवाई का करण्यात आली नाही ? असा प्रश्न निवेदनात उपस्थित करण्यात आला आहे.

मागण्या कोणत्या

श्री महालक्ष्मीदेवीच्या मूर्तीच्या गंभीर स्थितीस जे जबाबदार आहेत त्यांच्यावर फौजदारी गुन्हे नोंद केले जावेत. तसेच,आता जे संवर्धन केले जाणार आहे ,त्यांच्यावर जबाबदारी निश्‍चित करून संवर्धन केल्यावर मूर्तीची स्थिती बिघडल्यास त्यांच्यावर कारवाई केली जावी.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kolhapur maharashtra mandir mahasangh demand responsibility to be fixed before conservation of mahalaxmi idol css