कोल्हापूर : दृष्टिहीन तसेच वंचित घटकांच्या ज्ञानवर्धनासाठी आधुनिक पद्धतीने प्रयत्न करणे आवश्यक आहेत. त्यासाठी समाजाने पुढे येणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन खासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांनी येथे केले. शिवाजी विद्यापीठाच्या इतिहास अधिविभागाच्या वतीने आयोजित विक्रम रेपे संकल्पित राजर्षी शाहू महाराज ब्रेल पुस्तिकेच्या प्रकाशन सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. त्यांच्या हस्ते पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. उपस्थित काही अंध विद्यार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात त्यांच्या हस्ते पुस्तिका प्रदान करण्यात आली. ब्रेल लिपीमध्ये प्रकाशित होणारे हे पहिलेच शाहूचरित्र आहे. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के होते, तर प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील प्रमुख उपस्थित होते.

कोल्हापूर पुरालेखागाराचे अभिलेखाधिकारी गणेशकुमार खोडके, मराठी अधिविभागाचे प्रमुख डॉ. नंदकुमार मोरे यांनी मनोगत व्यक्त केले. डॉ. अवनीश पाटील यांनी प्रास्ताविक, विक्रम रेपे यांनी सूत्रसंचालन तर कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांनी आभार मानले.

राज्यात वितरण

शाहूचरित्राच्या ब्रेल पुस्तिकेचे मुद्रक स्वागत थोरात यांच्याकडून येत्या शैक्षणिक वर्षात महाराष्ट्रातील सर्व अंधशाळांमध्ये वितरण करण्यात येणार आहे. पुस्तिकेचा हिंदी व इंग्रजीमध्ये अनुवाद करण्याचाही मानस संकल्पक विक्रम रेपे यांनी व्यक्त केला.