कोल्हापूर : रस्ते कामाबाबत कोल्हापूर महापालिकेला लोकांचे शिव्याशाप खावे लागत आहेत. कामाकडे अधिकाऱ्यांचे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे. महापालिकेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार वाढला आहे, अशा शब्दांत राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी शनिवारी महापालिकेच्या एकंदरीत कामकाजावर तोफ डागली.

कोल्हापूर महापालिकेची आढावा बैठक झाल्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, कोल्हापुरातील रस्ते आत्यंतिक खराब झाले आहेत. खड्डे पडल्यामुळे वाहनधारक, पादचाऱ्यांना अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. रस्ते कामाबद्दल नागरिक नाराज आहेत. महापालिकेला त्यावरून लोकांचे शिव्याशाप खावे लागत आहेत.

कोल्हापूर महापालिकेतील रस्ते सुधारणा व्हावी, यासाठी आमदार निधी, नगर उत्थान निधी, शासनाचा १०० कोटी निधी यातून मोठ्या प्रमाणात निधी दिला. परंतु, कामाचे प्रमाण व गुणवत्ता (क्वालिटी व क्वांटिटी) हे दोन्ही खालावले आहे. अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे निकृष्ट कामे होत आहेत. कामामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार वाढला आहे, असा आरोप त्यांनी केला.

आमदारच हतबल

खरे तर कोल्हापूर महापालिकेत वारंवार रस्ते, वाहतूक, कर्मचारी, आरोग्य यांसह विविध विषयांवर आढावा बैठक घेऊन कामात सुधारणा करण्याच्या सूचना केल्या. परंतु, महापालिका प्रशासनाला जाग येत नाही. केलेल्या सूचना अधिकारी ऐकत नाही, अशा शब्दांत क्षीरसागर यांनी हतबलता व्यक्त केली. शहरातील रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था लक्षात घेता, यापुढे नवे रस्ते खराब झाले तर संबंधित उप शहर अभियंता जबाबदार राहतील, असे स्पष्ट वक्तव्य आमदार क्षीरसागर यांनी केले.

आज आयोजित बैठकीला अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, सहाय्यक आयुक्त कृष्णा पाटील, शहर अभियंता रमेश मस्कर, उपशहर अभियंते महादेव फुलारी, सुरेश पाटील, अरुण गुजर, निवास पवार, प्रोजेक्टचे सुरेश पाटील, संबंधित ठेकेदार व सल्लागार उपस्थित होते.आमदार क्षीरसागर यांनी दोषदायित्व कालावधीत व नवीन करण्यात येत असलेल्या रस्त्यांचे काम अपूर्ण व निकृष्ट दर्जाचे असल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली.

ठेकेदारांनी कामे तातडीने व वेळेत न केल्यास त्यांना ब्लॅकलिस्ट करण्याचे आदेश त्यांनी दिले. तसेच नव्याने तयार होणाऱ्या रस्त्यांचे मोजमाप, जाडी व गुणवत्ता तपासण्याची थेट जबाबदारी उप शहर अभियंत्यांवर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शहरातील पर्यटक व नागरिकांना सतत खराब रस्त्यांचा सामना करावा लागत असून, दिवाळीपूर्वी सर्व रस्ते सुस्थितीत करण्याचे आदेश आमदार क्षीरसागर यांनी शहर अभियंत्यांना दिले. भूसंपादन किंवा इतर अडचणी असलेल्या रस्त्यांच्या बाबतीत नगररचना विभागाशी समन्वय साधून तातडीने कामे पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या. वाहतुकीची वाढती समस्या लक्षात घेता योग्य नियोजन करण्याचेही निर्देश त्यांनी दिले.

यावेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांनी सर्व ठेकेदारांना नोटिसा बजावल्याचे सांगत, पावसाचा जोर कमी होताच दोन-तीन दिवसांत युद्धपातळीवर कामे सुरू करून दिवाळीपूर्वी सर्व रस्ते चांगले व दर्जेदार करण्याचे नियोजन केल्याचे त्यांनी सांगितले. या बैठकीला नगरोत्थान योजनेचे ठेकेदार एव्हरेस्ट इन्फ्रा प्रा. लि. कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर अन्सार मुल्ला व कन्सल्टंट संदीप गुरव उपस्थित होते.