कोल्हापूर : महाराष्ट्रात एक पुरोगामी पाऊल उचलत कोल्हापूर जिल्ह्यात प्रथमच तृतीयपंथी समुदायाच्या मैत्री संघटनेला रास्त भाव धान्य दुकानाचा परवाना मंजूर झाला आहे.

तृतीयपंथी समुदायाला भेदभाव, गरिबी, सामाजिक बहिष्करण आणि रोजगाराच्या संधी मिळण्यातील अडचणींना सामोरे जावे लागते. या पार्श्वभूमीवर, त्यांना रोजगाराचे साधन आणि मूलभूत हक्क मिळावेत, यासाठी मैत्री संघटनेने राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष महेश ढवळे यांच्याकडे मागणी केली होती.

या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण यांनी नवीन रास्त भाव धान्य दुकान प्रक्रिया राबवली. त्यानुसार, कोल्हापूर शहरात मैत्री संघटनेची निवड करून त्यांना नवीन दुकानाचा परवाना देण्यात आला. हा महाराष्ट्रातील पहिलाच प्रयोग असून यामुळे तृतीयपंथी समुदायासाठी एक आदर्श निर्माण झाला आहे.

मुख्यमंत्री रोजगार मेळाव्यात पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते मयुरी आळवेकर यांना हा परवाना प्रदान करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे आणि जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण उपस्थित होते. या निर्णयामुळे तृतीयपंथी समुदायाला आर्थिक स्वावलंबन आणि सामाजिक समावेशनाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल पडले आहे. हा उपक्रम तृतीयपंथी समुदायाच्या सक्षमीकरणासाठी प्रेरणादायी ठरेल आणि इतर जिल्ह्यांनाही असा पुढाकार घेण्यास प्रोत्साहन देईल, अशी अपेक्षा आहे.