कोल्हापूर : महालक्ष्मी मंदिराची अवस्था पाहता त्याचा विकास आराखड्यामध्ये विचार केलेला दिसत नाही. मंदिराच्या जतन संवर्धनाला आराखड्यात प्राधान्य देऊन त्यानंतरच तो शिखर समितीकडे सादर करावा, अशी सूचना जिल्ह्याच्या सहपालकमंत्री माधुरी मिसाळ यांनी केली.

जिल्हाधिकारी कार्यालयात महालक्ष्मी, जोतिबा विकास आराखड्याची बैठक झाली, यावेळी त्या बोलत होत्या. आमदार अमल महाडिक, देवस्थान समितीचे सचिव शिवराज नायकवडे, भाजपचे जिल्हाध्यक्ष विजय जाधव, नाथाजी जाधव, महेश जाधव उपस्थित होते.

मंत्री मिसाळ म्हणाल्या, महालक्ष्मी विकास आराखड्यातील कामे म्हणजे बाह्य सुधारणा स्वरूपाची आहेत. मंदिराचे दगडी बांधकाम, त्यावरील शिल्प यांची दुरवस्था झाली आहे. पावसाळ्यातील मंदिर गळती, सुटलेल्या शिळा-दगड यांचा विचार केला गेलेला नाही. आराखड्याच्या पहिल्या टप्प्यात मंदिराच्या संवर्धनाच्या कामांचा समावेश करावा. मंदिरावर ६४ योगिनी आणि अन्य शिल्पे फुटलेली असल्याने त्याच्या सुधारण्यासाठी केंद्रीय पुरातत्त्व विभागाकडे प्रस्ताव पाठवावा.

जोतिबा विकास आराखडा करताना तो प्लास्टिकमुक्त, वृक्षसंपदा, स्वच्छतागृह, खाद्यसंकुल यांचा समावेश असावा, अशी सूचना त्यांनी केली. आमदार महाडिक यांनी मंदिर बाह्य परिसरात अद्ययावत स्वच्छतागृहे उभारण्यासाठी महापालिकेने जागा उपलब्ध करून दिली तर तेथे जिल्हा नियोजन समितीचा निधी वापरता येईल, असे सांगितले.