अबकारीकराच्या विरोधात सराफ व्यावसायिकांनी शुक्रवारी अर्धा दिवस बंद पाळण्याच्या आवाहनाला अत्यल्प प्रतिसाद मिळाला. शहरातील बहुतेक दुकाने आज उघडी होती. तथापि, आज कोल्हापूर जिल्ह्यातील सराफ व्यावसायिकांनी काळ्या फिती लावून जिल्हाधिकारी कार्यालयावर दंडवत मोर्चा काढला. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर आल्यावर दंडवत घालणाऱ्या सराफ व्यावसायिकाला चक्क अंघोळ घातली. या वेळी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
केंद्र सरकारने सोन्याच्या व्यवहारावर १ टक्का अकबारी कर लावण्याचा निर्णय घेतला. सरकारच्या या निर्णयाविरोधात गेल्या १० दिवसांपासून देशभरातील सराफ व्यवसाय बंद ठेवले आहेत. मात्र सरकारने अद्याप यावर निर्णय न घेतल्याने आता हे आंदोलन अधिक व्यापक करण्याचा निर्धार व्यावसायिकांनी केला आहे. आज जिल्ह्यातील सराफ व्यावसायिकांनी काळ्या फिती लावून शहरातील प्रमुख मार्गावरून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. या मोर्चामुळे कोल्हापूर शहरातील वाहतूक नियंत्रण यंत्रणा मात्र कोलमडली होती.
दरम्यान, आज सराफ बंद आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी अन्य व्यावसायिकांनी दुकाने अर्धा दिवस बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले होते, मात्र या आवाहनाला अत्यल्प प्रतिसाद मिळाला. शहरातील सर्व दुकाने नेहमी प्रमाणे उघडी होती. ग्राहकांची खरेदी सुरू होती. बंदचा मागमूस कोठेही जाणवला नाही.
संग्रहित लेख, दिनांक 13th Mar 2016 रोजी प्रकाशित
सराफ व्यावसायिकांच्या बंदला अत्यल्प प्रतिसाद
अबकारीकराच्या विरोधात सराफ व्यावसायिकांनी शुक्रवारी अर्धा दिवस बंद पाळण्याच्या आवाहनाला अत्यल्प प्रतिसाद मिळाला.
Written by लोकसत्ता टीम
First published on: 13-03-2016 at 02:30 IST
Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Narrow response of goldsmith ban