कोल्हापूर : अकिवाट (ता. शिरोळ) येथे शुक्रवारी कृष्णा नदीत ट्रॅक्टर उलटून झालेल्या अपघातात आठ जण वाहून गेले. यातील पाच जणांना वाचवण्यात यश आले तर एकाचा मृत्यू झाला. सुहास शामगोंडा पाटील असे मृत व्यक्तीचे नाव आहे. अन्य दोघे पाण्यात वाहून गेले असून त्यांचा शोध सुरू आहे. हेही वाचा >>> ख्यातनाम चित्रकार सुधा मदन यांचे निधन ट्रॅक्टर ट्रॉलीतून हे सर्व जण जात असताना कृष्णा नदीत ट्रॅक्टर उलटून हा अपघात झाला. या मध्ये ट्रॅक्टरमध्ये बसलेले सुहास पाटील, श्रेणीक चौगुले, माजी जिल्हा परिषद सदस्य इकबाल बैरागदार, अरुण कोथळे, आण्णासाहेब हसुरे, अझहर आलासे, अंगद मोहिते यांच्यासह आठ जण बुडाले. यातील सहा जणांना बाहेर काढले. मात्र यामध्ये सुहास पाटील यांचा मृत्यू झालेला होता. आण्णासाहेब हसुरे, बैरागदार प्रवाहात वाहून गेले. एनडीआरएफ पथक, वजीर रेस्क्यू फोर्स, व्हाईट आर्मी, इंडियन रेडक्रॉस सोसायटी, कुरुंदवाड नगरपरिषदेच्या १० हुन अधिक यांत्रिक बोटीद्वारे त्यांचा शोध सुरू आहे. पालकमंत्री हसन मुश्रीफ,जिल्हाधिकारी अमोल येडगे, खासदार धैर्यशील माने, प्रांत अधिकारी मोसमी बर्डे, माजी आमदार उल्हास पाटील, संजय पाटील यड्रावकर यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली.