पेठवडगाव स्वतंत्र तालुका झाला पाहिजे,असा निर्धार वडगाव तालुका कृती समितीच्या बैठकीत करण्यात आला. या मागणीकडे दुर्लक्ष झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आला.या बैठकीला पेठवडगाव परिसरातील ३० गावातील जि.प. सदस्य, पंचायत समिती, सरपंच, कारखाना संचालक, विविध सोसायटी चेअरमन व सर्वपक्षीय घटक उपस्थित होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी माजी पोलिस आयुक्त गुलाबराव पोळ होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणुन माजी नगराध्यक्षा विद्याताई पोळ उपस्थित होत्या. बैठकीत मुख्यमंत्री,पालकमंत्री,जिल्हाधिकारी यांना निवेदन व तीव्र आंदोलन करण्याचा निर्णय झाला.
तालुका कृती समितीचे अध्यक्ष गुलाबराव पोळ म्हणाले, पेठवडगाव तालुका व्हावा ही गेली कित्येक वर्षांची मागणी प्रलंबित आहे. तालुका मागणीसाठी स्व. विजयसिंह यादव यांच्या अध्यक्षतेखाली समितीचे प्रयत्न सुरू होते. नुकताच करवीर तालुका विभाजन करणेसाठी शासनाने समिती नियुक्त केली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात करवीर व हातकणंगले हे दोन तालुके अडीच ब्लॉकचे आहेत. तालुका विभाजनात पेठवडगाव तालुका झालेस परिसरातील तीस गावांसाठी मध्यवर्ती केंद्र ठरणार आहे.
पारगावचे सामाजीक कार्यकर्ते प्रभाकर साळुंखे,ॲड.पी.डी.शिंदे व ॲड. दीपक पाटील जिल्हा परिषद सदस्य प्रविण यादव,जिल्हा इरिगेशन फेडरेशनचे अध्यक्ष विक्रांत पाटील, प्रा.बी.के.चव्हाण,प्रा.प्रदिप तोडकर,शिवाजी माने,गुरुप्रसाद यादव,ॲड.दीपक पाटील,प्रदिप दशमुख,मनोहर काटकर,शिवाजी आवळे,लमुवेल सनदी यांनी मनोगत व्यक्त केली. संजय पाटील यांनी आभार मानले. राजकुमार चौगुले यांनी सुत्रसंचलन केले.
