महानगरांबरोबरच शहर, तालुका पातळीवरील गावातील घनकचऱ्याची समस्या उग्र होत चालल्याचे चित्र असताना कागल नगरपालिकेने घनकचऱ्यापासून वीज निर्मितीचा प्रयोग आकाराला आणला आहे. या प्रकल्पामुळे कागल नगरीतील नऊशे पथदीप पहिल्या टप्प्यात उजळणार असून एकंदरीत दोन हजार पथदीप प्रकाशमान होणार आहेत. राज्यातील ‘क’ वर्ग नगरपालिकेतील हा पहिलाच प्रयोग आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील कागल नगरपालिकेने विविध प्रकारची विकासकामे हाती घेऊन पायाभूत विकासाची कामे मार्गी लावली आहेत. आघाडी शासन काळात मंत्री असताना हसन मुश्रीफ यांनी मोठा निधी खेचून आणून त्याद्वारे जयसिंग तलावात बोटींग क्लब, खेळण्याचे भव्य अॅम्युझमेंन्ट पार्क, विजयादेवी बगीच्यामध्ये अत्याकर्षक सुविधा, चाफळनंतरचे चित्ताकर्षक राममंदिर आदी प्रकल्प पूर्ण करून कागलला पर्यटन केंद्राचे स्वरूप मिळवून दिले. कागलला बारामती स्वरूप देण्याचा ध्यास घेऊन मुश्रीफ यांनी कचऱ्यापासून वीज निर्मितीचा प्रयोग राबवण्याचे ठरवले.
कागल शहरामध्ये दररोज आठ टन कचरा जमा होतो. त्यातील चार टन ओला कचरा असून त्यापासूनच वीज निर्मिती केली जाणार आहे. चार टन सुक्या कचऱ्यापासून गांडुळ खताची निर्मिती केली जात आहे. सुमारे साडेतीन कोटी रुपये खर्चाचा कागल या क वर्ग नगरपालिकेतील प्रकल्प यशस्वीपणे कार्यरत होत आहे. नगरविकास खात्याचा पदभार असताना आपण जर्मन तंत्रज्ञानातील कचरा विल्हेवाट व्यवस्थापनाच्या या छोटय़ा-छोटय़ा प्रकल्पांबद्दल प्रेरित झालो होतो. कागल नगरपालिकेच्या माध्यमातून हा प्रकल्प हाती घेतला. कचऱ्याच्या समस्येत हा चांगला उपाय असल्याचे आमदार हसन मुश्रीफ यांनी सांगितले. या प्रकल्पाचे उद्घाटन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते १६ फेब्रुवारीला होणार आहे.
या प्रकल्पातून निर्माण होणाऱ्या विजेपासून पहिल्या टप्प्यात नऊशे पथदिवे लागणार आहेत. सदरचे दिवे लागण्यासाठी महावितरणचे खांब उपयोगात येत नाहीत त्यासाठी नव्या प्रकारची खांबाची उभारणी कागल नगरपालिकेला करावी लागली. एकूण दोन हजार पथदीप प्रकाशमान होणार आहेत.
उद्घाटनादिवशी ३६ वॅटचे २५० बल्ब प्रज्वलित होतील. घनकचरा प्रकल्प स्थळावर बेघर वसाहत, िरग रोड, बसस्थानक, मुख्य माग, गबी चौकपर्यंतच पथदीप यातून प्रकाशित होणार आहेत. कागल शहरातील सर्व ओल्या कचऱ्यापासून तसेच बाहेरूनही ओला कचरा आणून शहरातील सर्व सार्वजनिक पथदिवे प्रज्वलित करण्याचे नियोजन आहे. ग्रीन एलिफंटा लिमिटेड या कंपनीने प्रकल्पाची उभारणी केली असून त्यासाठी कंपनीचे साई किरण प्रभू, मेघनील महाजन, क्षितिजा पाटील यांनी विशेष योगदान दिले.
संग्रहित लेख, दिनांक 16th Feb 2016 रोजी प्रकाशित
कागल नगरपालिकेचा घनकच-यापासून वीजनिर्मितीचा प्रयोग
शहरातील नऊशे पथदीप पहिल्या टप्प्यात उजळणार
Written by लोकसत्ता टीम

First published on: 16-02-2016 at 03:10 IST
Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Power generation experiment from solid waste of kagal municipality