सांगली: गॅसच्या दरात झालेल्या प्रचंड दरवाढीमुळे त्रस्त झालेल्या सामान्यांच्या रोषाला वाचा फोडण्यासाठी गुरूवारी मदन पाटील युवा मंचच्यावतीने गॅस सिलेंडरची अंत्ययात्रा काढून अंत्यसंस्कार करण्यात आले. युवा मंचचे अध्यक्ष आनंदराव लेंगरे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.

महागाईने कळस गाठला असताना केंद्र सरकारने स्वयंपाकाच्या गॅस दरात प्रचंड वाढ केली आहे. अच्छे दिन देउ असे आश्‍वासन देत सत्ता हस्तगत करणार्‍या केंद्रातील मोदी सरकारने सातत्याने गॅस दरात वाढ केली आहे. काँग्रेसच्या काळात 410 रूपये गॅस सिलेंडरचा दर होता, आता तो 1100 रूपयावर गेला आहे. यामुळे सामान्य माणसाचे महिन्याचे गणित बिघडले आहे. उज्वला योजनेचा जाहीराती करून केंद्राने स्वत:ची पाठ थोपटून घेतली, मात्र, आज या योजनेतील महिलांना गॅस घेणे परवडत नाही. याकडे लक्ष वेधण्यासाठी मदन पाटील युवा मंचच्यावतीने गॅस सिलेंडरची अंत्ययात्रा काढण्यात आली.

आणखी वाचा- कोल्हापूर: महागाई विरोधात स्वाभिमानी शेतकरी पक्षाचा इचलकरंजीत तिरडी मोर्चा

शहरातील अमरधाम स्मशानभूमीमध्ये विधीवत सिलेंडर मृत्यूशय्येवर ठेवून अग्नि देण्यात आला. यावेळी केंद्र शासनाच्या नावाने बोंबही मारण्यात आली. या आंदोलनामध्ये श्री. लेंगरे यांच्यासह नगरसेवक संतोष पाटील, अविनाश जाधव, कय्युम पटवेगार, मयूर बांगर, अमित लाळगे, हाजी तोफिक बिडीवाले, धनंजय खांडेकर, कल्पना देवकर, रेखा भुई, सुलभा रास्ते, विमल तापेकर, शकुंतला मोरे, रेखा मोरे, निर्मला घाडगे, गीता भोसले, पुष्पा पाटोळे, आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.