कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात मंगळवारी पाणलोट क्षेत्रात पावसाचा मुक्काम कायम असल्याने नदी, धरणातील पाणी पातळीत वाढ होत आहे. जिल्ह्यातील ४६ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. गेले तीन दिवस कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे.

आज पावसाचे प्रमाण काहीसे कमी होते. अधूनमधून पावसाच्या जोरदार सरी येत होत्या. पश्चिमेकडील पाणलोट क्षेत्रात अजूनही मुसळधार पाऊस पडत आहे. गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक ७० मिमी पाऊस झाला. याशिवाय, पन्हाळा, शाहूवाडी, करवीर, गडहिंग्लज, भुदरगड, आजरा, चंदगड या तालुक्यांत चांगला पाऊस पडला.

हेही वाचा – कोल्हापुरातील दहीहंडीवर राजकीय प्रभाव; पावसातही उत्साह

राधानगरी धरणात ८.२३ टीएमसी पाणीसाठा आहे. हे धरण भरले असून, त्याचे तीन दरवाजे खुले केले आहेत. त्यातून ५७८४ क्युसेक विसर्ग सुरू आहे. वारणा धरणातून ३८६५ क्युसेक विसर्ग सोडण्यात आला आहे. नदीकडेच्या लोकांनी दक्ष राहावे, असा इशारा मंगळवारी वारणा धरण व्यवस्थापनाने दिला आहे. जिल्ह्यातील पाण्याखाली गेलेल्या बंधाऱ्यांच्या संख्येत आज आणखी वाढ झाली असून, ही संख्या ४६ झाली आहे.

हेही वाचा – बँकेचे धनादेश समाशोधन त्याच दिवशी होणार; रक्कम तत्काळ जमा होणार

अणुस्कुरा घाटात दरड कोसळली असल्याने कोल्हापूर – कोकण मार्गावरील वाहतूक रविवारपासून विस्कळीत झाली होती. कोसळलेला भाग दूर करण्याचे प्रयत्न गतीने सुरू झाले आहेत. आता या मार्गावरून एकेरी वाहतूक सुरू झाल्याने प्रवासी, वाहनचालकांना दिलासा मिळाला आहे.