कोल्हापूर-गगनबावडा मार्गावर मंगळवारी दोन विविध ठिकाणी झालेल्या अपघातात दोन ठार तर तिघे जण जखमी झाले. कुडित्रेनजीक अॅपेरिक्षा व एसटीचा अपघात होऊन एक प्रवासी ठार तर तिघे जखमी झाले. तर ट्रकचालकाचा ताबा सुटून झालेल्या अपघातात ट्रकचालक ठार झाला.
प्रवासी पांडुरंग दत्तात्रय सूर्यवंशी (वय ४५, रा. कळे), ट्रकचालक सूरज शिवाजी कांबळे (वय २२, रा. गगनबावडा) अशी मृतांची नावे आहेत. तर रिक्षाचालक विलास आनंदा नाईक (वय ४८, रा. कळे), संजय रघुनाथ भालकर (वय ४०), श्रीपती गणपती पवार (वय ५५) अशी जखमींची नावे आहेत.
गगनबावडा-कोल्हापूर महामार्गावर कुडित्रे गावानजीक एसटी व अॅपेरिक्षाच्या धडकेत एक प्रवासी ठार तर तिघे जखमी झाले. सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास कळे येथून अॅपेरिक्षा प्रवासी घेऊन कोल्हापूरकडे येत होती. कुडित्रे गावानजीक रेणुका पेट्रोल पंपासमोर रिक्षा आली असता कोल्हापूरकडून गगनबावडय़ाकडे जाणाऱ्या एसटीला रिक्षाची जोरदार धडक बसली. यामध्ये रिक्षामधील पांडुरंग सूर्यवंशी हे जागीच ठार झाले. तर रिक्षाचालक विलास नाईक, संजय भालकर, श्रीपती पवार हे जखमी झाले. जखमींना तत्काळ सीपीआर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. गगनबावडा येथून कोल्हापूरकडे वाळू घेऊन एक ट्रक सकाळी साडेसहा वाजता येत होता. आडूरनजीक ट्रक आला असता ट्रकचालक सूरज शिवाजी कांबळे याचा ट्रकवरील ताबा सूटून ट्रक रस्त्याकडेला असणाऱ्या झाडावर आदळला. यामध्ये सूरज जागीच मृत झाला. सूरजच्या पश्चात आई, वडील, बहीण असा परिवार आहे. एकुलत्या एका मुलाचा मृत्यू झाल्याने नातेवाइकांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. या घटनेची नोंद सीपीआर पोलीस ठाण्यात केली.