कोल्हापूर : कर्नाटक बेंदूरच्या निमित्ताने इचलकरंजीत रविवारी आयोजित केलेल्या लहान गटातील लाकूड ओढण्याच्या शर्यतीत रुपचंद बंडगर यांच्या बैलाने २८.७ सेकंदात निर्धारीत अंतर पार करून प्रथम क्रमांक पटकावला. या शर्यतीमध्ये एकूण ३१ बैल सहभागी झाले होते.

शेतकरी तरुण आणि बेंदूर उत्सव मंडळाच्यावतीने डिकेटीइ नारायण मळाच्या पटांगणावर झालेल्या शर्यतीचा शुभारंभ प्रगतशील शेतकरी संजय पाटील यांच्या हस्ते झाला. यावेळी माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे, उत्तम आवाडे, प्रकाश दत्तवाडे, बेंदूर उत्सव मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब कलागते, उपाध्यक्ष नंदू पाटील, राहुल गाट उपस्थित होते.

या शर्यतीत आरबोळे यांच्या बैलाने २९.२ सेकंदासह द्वितीय आणि महादेव पाटील यांच्या बैलाने २९.४ सेकंदासह तृतीय क्रमांक मिळविला. यावेळी खजिनदार अहमद मुजावर, आदित्य आवाडे, संपत जामदार, शिवाजी माळी, शांताप्पा मगदूम, सागर मगदूम, पापालाल मुजावर आदी उपस्थित होते.