कोल्हापूर : पंचगंगा नदीनजीकचे वाढते अतिक्रमण, त्यामुळे आक्रसत चाललेले पात्र, बेभरवशी पाऊसमान यामुळे महापुराचा धोका वाढत असताना आता कोल्हापूर महापालिकेच्या अपुरी नालेसफाई, कचऱ्याचे ढीग अशा बेभरवशी कारभारामुळे नवे संकट ओढावल्याचे पहिल्याच मुसळधार पावसात दिसून आले. एकीकडे कोल्हापुरात शक्तिपीठ महामार्ग, महालक्ष्मी विकास आराखडा यांसारखे मोठमोठे प्रकल्प आणून पर्यटनावरील ताण वाढवला जाणार असताना अशी संकटे आणखी गंभीर होऊन कोल्हापूरच्या दुर्दशेत भर पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

या बातमीसह विशेष लेख आणि इतर दर्जेदार मजकूर मोफत वाचा

कोल्हापूर जिल्ह्यात दर दोन – पाच वर्षांनी महापुराचे संकट ओढवत असते. पश्चिम घाटातील जोरदार पावसामुळे पंचगगा नदीची पाणीपातळी वाढत जाते. दळणवळण, पूरग्रस्तांचे स्थलांतर नियोजन, राष्ट्रीय बचाव पथकाचे काम अशी धांदल उडालेली असते. ही संकटे कायम असताना कोल्हापूर पंचगंगा नदी महापूर निवारणाचा २२०० कोटी रुपयांचा आराखडा कागदावरच आहे. तर, दुसरीकडे शक्तिपीठ महामार्ग साकारण्याच्या हालचाली सुरू आहेत. ११०० कोटी रुपये खर्चाचा महालक्ष्मी मंदिर विकास आराखडा मंजूर झाला आहे.

हे प्रकल्प साकारले, तर कोल्हापुरातील नागरी, तसेच पर्यटकांचा ताण आणखी वाढणार आहे. आधीच कोल्हापूर शहराची अवस्था बकाल खेड्यासारखी झाली आहे. नगरनियोजन करताना कोल्हापूर महापालिका प्रशासनाची पुरती फरपट होत आहे. गुरुवारच्या ढगफुटीसदृश पावसामुळे कोल्हापूर महापालिकेचे नालेसफाई, कचरा उठाव, प्लॅस्टिकवरील तकलादू कारवाई याचे पितळ उघडे पडल्याचे अवघ्या शहरातील बकाल स्थितीवरून दिसून आले.

महापालिकेवर कारवाई व्हावी

याच वेळी पंचगंगा नदीच्या राजाराम बंधाऱ्यात सुमारे तीन एकर क्षेत्रात १०० टनाहून अधिक कचरा साचला गेला. नदीच्या या विद्रूपीकरणाला कोल्हापूर महापालिकेचे कागदी घोडे नाचवणारे नियोजन कारणीभूत ठरल्याचा ठपका अभ्यासकांनी ठेवला आहे. याबाबत उच्च न्यायालयाच्या आदेशाने स्थापन झालेल्या पंचगंगा नदी प्रदूषण अभ्यास समितीचे सदस्य उदय गायकवाड यांनी सांगितले, की कोल्हापूर महापालिकेचे कचरानियोजन बेशिस्त आहे. घंटागाड्या आठवड्यातून तीन वेळाच काम करीत आहेत. शहरात ओपन बार, वाढदिवस, घरी मागवले जाणारे खाद्य यातून प्लॅस्टिकचा वापर वाढला आहे. त्याचे स्वच्छता नियोजन महापालिकेकडून केले जात नसल्याचे अधिकाऱ्यांसमवेत केलेल्या पाहण्यांतही दिसून आले आहे. त्यामुळे पंचगंगा नदीत प्लॅस्टिकचा खच साठल्याबद्दल प्रदूषण नियंत्रण मंडळाला कोल्हापूर महापालिकेवर नोटीस काढण्याची कारवाई करण्यास भाग पाडणार आहे.

कोल्हापूरवर महापूर संकटाची तलवार कायम असताना शक्तिपीठसारखे प्रकल्प लादून नव्याने महापूर संकटाला निमंत्रण देत आहोत. नागरिक, शेतकऱ्यांचा विरोध असतानाही शक्तिपीठसारखे प्रकल्प राबवले, तर कोल्हापूर शहरात कचरा, प्लॅस्टिक आणखी मोठ्या प्रमाणात वाढणार हे उघड आहे. महापालिकेची स्वच्छता यंत्रणा कुचकामी ठरल्याचे पहिल्याच पावसात झालेल्या वाताहतीतून स्पष्ट झाले आहे. एकल वापर प्लॅस्टिकबाबतची महापालिकेची कारवाई तकलादू आहे. डॉ. मधुकर बाचूळकर पर्यावरण अभ्यासक

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shaktipith will increase the problems of flood in kolhapur plastic pollution in panchganga river sud 02