गोहत्तेस जबाबदार असणाऱ्या काडसिद्धेश्वर स्वामींना अटक झाली पाहिजे, या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, या मागणीसाठी उद्धव ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी शुक्रवारी येथे निदर्शने केली.कणेरी मठ येथील गोशाळेतील गाईंचा मृत्यू झाला आहे. मठामध्ये सुमंगल पंचमहाभूत लोकोत्सव सुरु असून त्यामध्ये गाईचे महत्त्व सांगणारा एक भाग आहे. नेमक्या अशाच वेळी मठांमध्ये गाईंचा मृत्यू झाल्याने त्यावरून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

याप्रश्नी ठाकरे गट शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, स्मिता मांडरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी निदर्शने केली. गो हत्येस कारणीभूत असणारे अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामी यांना अटक करण्यात यावी, या गंभीर प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून जबाबदार घटकांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.

याबाबत गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्याला निवेदन देण्यात आले. त्यामध्ये म्हटले आहे कि, ५२ देशी गाईंचा एकाच वेळी मृत्यू झाला ही धक्कादायक बाब आहे. कणेरी मठातून देशभरात पर्यावरणाचा व गोपालनाचा संदेश दिला जात असताना याच मठावर मानवी शिळे अन्न खाऊ घातल्याने मोठ्या प्रमाणात देशी गाईंचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणाचे तटस्थपणे चौकशी करण्यात यावी. घटनेचे वृत्ताकन करणाऱ्या पत्रकारांना मारहाण झाल्याने हल्लेखोरांना कठोर शासन करण्यात यावे, असे म्हटले आहे