शिंदे समर्थक खासदार संजय मंडलिक यांच्या घरावर गुरुवारी शिवसैनिकांनी मोर्चा काढला. कार्यकर्त्यांच्या हातात मंडलिक यांनी बेन्टेक्स सोने घातलेले फलक लक्षवेधी ठरले.

एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर जिल्ह्यातील दोन्ही खासदार, माजी मंत्री, आमदार, माजी आमदार यांनी शिंदे यांना समर्थन दिले असल्याने शिवसेनेला हादरा बसला आहे. फुटलेल्या लोकप्रतिनिधींनी विरोधात शिवसैनिकांमध्ये संताप आहे. यापूर्वी खासदार धैर्यशील माने यांच्या येथील घरावर मोर्चा काढला होता. तर आज मंडलिक यांच्या घरावर मोर्चा काढण्यात आला.

शिवसेनेत आहेत ते सोने; फुटले ते बेन्टेक्स, अशी टीका मंडलिक यांनी शिवसेनेतून फुटलेल्यांवर केली होती. यामुळे मंडलिक यांनी बेन्टेक्सचे दागिने घातले असलेले फलक कार्यकर्त्यांनी घेतले होते. गद्दार मंडलिक अशा घोषणा देत निघालेला मोर्चा पोलिसांनी मुख्य रस्त्यावर अडवला तेव्हा कार्यकर्त्यांशी झटापट झाली.

अव्यवस्थेचे दर्शन

आजच्या मोर्चात कार्यकर्त्यांची संख्या जेमतेम होती. रक्षाबंधन असल्याने अनेकांनी मोर्चाकडे पाठ फिरवली. जिल्हा प्रमुख, शहर प्रमुख यांच्यासह मोजकेच कार्यकर्ते मोर्चा सहभागी झाले होते, नियोजनाचा अभाव मोर्चात प्रकर्षाने जाणवत होता. एक फसलेला मोर्चा अशी त्याची अवस्था झाली होती.