स्वीकृत नगरसेवक म्हणून ताराराणी आघाडीचे सुनील कदम यांची निवड रोखण्याच्या सत्ताधाऱ्यांच्या प्रयत्नाला राज्य सरकारने दणका दिला. महापालिका आयुक्तांची शिफारस बहुमताच्या जोरावर नामंजूर करणाऱ्या कॉँग्रेस व राष्ट्रवादीच्या सदस्यांना आता सभागृत माजी महापौर कदम यांचा सामना करावा लागणार आहे. हसन मुश्रीफ व सतेज पाटील या आमदारद्वयींना यामुळे नामुष्की आल्याचे पालिका वर्तुळात मानले जात आहे.

महानगरपालिकेतील पाच स्वीकृत सदस्य निवडी साठी २० फेब्रुवारी रोजीच्या महासभेत बहुमत असलेल्या कॉँग्रेस व राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या सदस्यांनी तौफिक मुल्लाणी, मोहन सालपे (कॉँग्रेस), प्रा. जयंत पाटील (राष्ट्रवादी), किरण नकाते (भाजप) यांची शिफारस मंजूर केली; परंतु ताराराणी आघाडीचे सुनील कदम यांची शिफारस बहुमताने नामंजूर केली. या वेळी सभागृहात दोन्ही कॉँग्रेस व ताराराणी आघाडी-भाजपच्या नगरसेवकांनी कायद्याचा काथ्याकूट केला होता.

तरीही सुनील कदम यांच्या नावाला कॉँग्रेस-राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी ठाम विरोध केला. कदम यांची स्वीकृत नगरसेवक म्हणून निवड करण्याची शिफारस नाकारताना दोन्ही कॉँग्रेसच्या नगरसेवकांनी दोन आक्षेप नोंदविले होते.

याबाबत कदम यांनी शासनाकडे धाव घेतली. त्याची सुनावणी होऊन नगरविकास विभागाचे सचिव अनिष परशुरामे यांनी कदम यांच्या बाजूने निकाल दिला.

यामुळे सभागृहात येण्याचा तयारीत असलेल्या सुनील कदम यांनी राजकीय द्वेषातून माझ्या नावाला विरोध करण्यात आला. माझी बाजू रास्त होती. राज्य सरकारने आपल्याला योग्य न्याय दिला आहे. बहुमताने काहीही निर्णय घेऊन चालत नाही, असे म्हणत विरोधकांवर निशाणा साधला.