successful research on hydrogen generator in kolhapur zws 70 | Loksatta

कोल्हापुरात ‘हायड्रोजन जनरेटर’चे यशस्वी संशोधन; हरित ऊर्जानिर्मितीला चालना

केंद्र सरकारच्या हरित ऊर्जा धोरणाच्या ( मिशन ग्रीन हायड्रोजन) दृष्टीने हे संशोधन महत्त्वपूर्ण ठरणारे आहे.

hydrogen generator in kolhapur
प्रा. आरिफ शेख फोटो- लोकसत्ता

कोल्हापूर : तळसंदे येथील डी. वाय. पाटील टेक्निकल संस्थेत नव्याने उभारलेल्या संशोधन केंद्राच्यावतीने ‘ग्रीन हायड्रोजन जनरेटर’चे यशस्वी संशोधन करण्यात आले आहे. या केंद्रातील संशोधक प्रा. आरिफ शेख यांनी पूर्णत: ग्रीन हायड्रोजन जनरेटर युनिटचे संशोधन व निर्मिती केली आहे. केंद्र सरकारच्या हरित ऊर्जा धोरणाच्या ( मिशन ग्रीन हायड्रोजन) दृष्टीने हे संशोधन महत्त्वपूर्ण ठरणारे आहे.

 राष्ट्रीय हरित हायड्रोजन वीजनिर्मितीच्या महत्त्वपूर्ण प्रकल्पास केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली असून २०३० पर्यंत ५ दश लक्ष मेट्रिक टन स्वच्छ हायड्रोजन इंधन उत्पादन करण्याचा उद्देश आहे. तळसंदेचे हे युनिट स्वयंचलित असून संपूर्णत: सौरऊर्जेवर कार्य करणार आहे. यामध्ये पाण्याच्या इलेक्ट्रोलिसीसपासून हायड्रोजन वायू पाण्यापासून वेगळा करण्याची पद्धती वापरात आणून अचूक संशोधनाअंती दोन वेगवेगळय़ा हायड्रोजन सेलची निर्मिती केली आहे. या तंत्रज्ञानामुळे ऊर्जा निर्मिती होत असताना अवशेष म्हणून निव्वळ पाणी शिल्लक राहील. धूर निघण्याची अजिबात शक्यता नाही.

कमी खर्चात वीजनिर्मिती

या युनिटचे वैशिष्टय़ म्हणजे हायड्रोजन वायू निर्माण करण्यासाठी औष्णिक ऊर्जा, सौर व पवन ऊर्जेचा वापर केला जाऊ शकतो. कमीत कमी खर्चामध्ये वीजनिर्मिती तसेच त्याचा वापर मोटार, अवजड गाडय़ांमध्ये होणार असल्याचे शेख यांनी सांगितले. संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार करण्यात आलेल्या या संशोधनाद्वारे देशाच्या प्रगतीला चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

ड्राय सेलची निर्मिती

 या हायड्रोजन जनरेटरमध्ये पेटंट टेबल ड्राय सेलची निर्मिती करण्यात आली आहे. हा ड्राय सेल एसी किंवा डीसी सप्लायवर कार्यान्वित होतो. यात पूर्णत: स्वयंचलित स्मार्ट रेग्युलेटरची व्यवस्था करण्यात आली आहे. टू स्ट्रोक, फोर स्ट्रोक इंजिनच्या क्षमतेनुसार जनरेटरमध्ये हायड्रोजनची निर्मिती होती. गरजेइतकीच हायड्रोजनची निर्मिती होते. या माध्यमातून हरित ऊर्जा उपलब्ध होते.

मराठीतील सर्व कोल्हापूर ( Kolhapur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 26-01-2023 at 04:36 IST
Next Story
कोल्हापूर : अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीचा खून; पत्नीसह आठ आरोपींना जन्मठेपेची शिक्षा