कोल्हापूर : चप्पल लाईन येथील छ. शिवाजी चौक ते पापाची तिकटी हा रस्ता चर्चेचा विषय ठरला आहे. काही वर्षांपूर्वी या रस्त्याचे काम करण्यात आले होते. रस्ता किमान आठ वर्षे खराब होणार नाही असा दावा त्यावेळीस केला गेला. परंतु वर्षभराच्या आत रस्ता खराब झाल्याने महापालिकेचा दावा फोल ठरला. या विरोधात आज आम आदमी संघटनेने आवाज उठवल्यानंतर कामाला सुरुवात झाली. चप्पल लाईन येथील विद्युत सेवावाहिनी शिफ्टिंगचे काम सुरु केले आहे.

चप्पल लाईन रस्त्यावर कायम पर्यटक तसेच शहरातील नागरिकांची वर्दळ असते. शहराच्या पूर्व व पश्चिम बाजूस जोडणाऱ्या प्रमुख रस्त्यापैकी एक असा हा मार्ग आहे. रस्त्याच्या बाजूस गटार केली नसल्याने पाणी साचून हा रस्ता खराब होत होता. तसेच रस्त्याची उंची वाढल्याने पावसाचे पाणी दुकानांमध्ये शिरत होते. यावर कायमचा उपाय म्हणून सिमेंटचा रस्ता करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला.

रस्त्याचे काम सुरु होताच खाली असलेल्या विद्युत सेवावाहिन्यांचा प्रश्न उभा राहिला. या वाहिन्या एक मीटर खोल असणे अपेक्षित असताना त्या फक्त दोन फुटावर टाकल्या आहेत. या सेवावाहिनी शिफ्ट करण्यासाठी विद्युत विभागाचे पुरेसे कर्मचारी उपलब्ध नसल्याने, तसेच खोदकाम करताना पोकलॅनचे बकेट लागून वाहिनी शॉर्ट झाल्याने ठेकेदाराने काम बंद केले होते.याबाबत स्थानिक व्यापारांनी आपच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क करून रस्त्याचे काम पुन्हा सुरू व्हावे आणि ते दर्जेदार व्हावे याकरिता संपर्क केला होता.

हेही वाचा >>>इचलकरंजी दूधगंगा पाणी प्रश्न: जोरदार निदर्शने; आमदार आवाडे यांच्यावर टीकास्त्र

आप पदाधिकारी व स्थानिक व्यापाऱ्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांसोबत कामाची पाहणी केली. विद्युत सेवावाहिनीच्या शिफ्टिंग बाबत ठोस निर्णय घेऊन काम सुरु करावे असे आप चे प्रदेश संघटन सचिव संदीप देसाई यांनी महावितरणचे सहाय्यक अभियंता सुनील दायगुडे व ठेकेदार यांना सांगितले.

यावर दायगुडे यांनी आठ कर्मचारी लावून लाईन वर काढून घेतो, यासाठी ठेकेदाराने सहकार्य करावे असे सांगितले. नंतर प्रणिल इन्फ्रा या ठेकेदाराने शिफ्टिंगसाठी लागणारे खोदकाम करण्याची तयारी दर्शवली. यामुळे रस्त्याचे थांबलेले काम पुन्हा सुरु झाले. ही लाईन रस्त्यासाठी आवश्यक न्यूनतम पातळी उकरल्यानंतर त्याखाली टाकली जाणार असल्याचे महावितरण अधिकाऱ्यांनी सांगितले. काम सुरु झाल्याने व्यापाऱ्यांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.

यावेळी आप शहराध्यक्ष उत्तम पाटील, अभिजित कांबळे, राजेश खांडके, पापाची टिकटी व्यापारी मंडळाचे, भालचंद्र परदेशी, मारुती गवळी, फिरोज सतारमेकर, महेश भोसले, पंडित भोसले, राजन सातपुते, सुभाष भेंडे, विनायक कदम, गणेश डोईफोडे, अमर जाडेकर, जयदत्त लोकरे, लक्ष्मीकांत पवार, संदेश महाजन, विरेन वच्छानी आदी उपस्थित होते.