कोल्हापूर : कोल्हापूर पोलिसांनी घरफोडी करणाऱ्या तिघा आरोपींना पकडून त्यांच्याकडून १४ घरफोडी चोरीचे गुन्हे मंगळवारी उघडकीस आणले आहेत. त्यांच्याकडून २४ लाख ३२ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

कोल्हापूर पोलिसांत काही घरफोडीचे गुन्हे दाखल झाले असून त्याच्या तपासादरम्यान राजू सल्वराज तंगराज (कारगल, शिमोगा, कर्नाटक) याने साथीदारांसोबत जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी घरफोडी केल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या पथकासमोर आली होती. गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून राजू तंगराज आणि भिमगोंडा मारुती पाटील (हलकर्णी, ता.गडहिंग्लज) या दोघांना ताब्यात घेतले. त्यांनी जिल्ह्यात १३ ठिकाणी घरफोडी केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून सुमारे १९ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

हेही वाचा – स्वदेशी प्रजातीचे देखणे अश्व पाहण्याची संधी, पुण्यात शनिवारपासून दोन दिवस ‘मारवाडी हॉर्स शो’

हेही वाचा – पिंपरी महापालिका अतिरिक्त आयुक्तपदी सनदी अधिकाऱ्याची नियुक्ती करा, महापालिका आयुक्तांचे राज्य शासनाला पत्र

लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील संशयित श्रीकृष्ण उर्फ अमोल संजय अलुगडे (भाट शिरगाव, ता. शिराळा) याला शिये फाटा येथून ताब्यात घेवून ५ लाख रुपये किंमतीचा सोन्याचा कमरपट्टा हस्तगत करण्यात आला, असे पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी सांगितले.