पहिल्याच दिवशी १३३ टक्के उद्दिष्ट पूर्ण झाल्याचा दावा
वनसंवर्धनाबद्दल जनजागृती करून पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी जिल्ह्यात शुक्रवारी दोन कोटी वृक्षलागवडीचा उपक्रम उत्साही वातावरणात राबविण्यात आला. पहिल्याच दिवशी १३३ टक्के उद्दिष्ट पूर्ण झाल्याचा दावा प्रशासनाने केला. सुजलाम-सुफलाम असणारा जिल्हा वृक्षलागवड द्वारा हिरवागार करण्याचा संकल्प करीत शासनाच्या या अभियानाचे बीजारोपण करण्यासाठी हजारो हात सरसावले.
या निमित्ताने नागरिकांना विविध जातींचे वृक्ष भेट देऊन वनसंवर्धनाची माहिती पटवून देण्यात आली. जिल्ह्यात जंगलांचा ऱ्हास होत असल्याने भविष्यात होणाऱ्या गंभीर परिणामाबद्दल जनतेला अवगत करण्यात आले. वृक्षलागवड उपक्रमात महसूल विभाग, जिल्हा परिषद, शाळा, महाविद्यालय, आरोग्य विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलिस विभाग, ग्रामपंचायत प्रशासन, सामाजिक संस्था सहभागी झाल्या. यासाठी वनविभागाने जय्यत तयारी केली आहे. वनविभागाच्या रोपवाटिकेत वनौषधासह विविध प्रकारची रोपे तयार करण्यात आली होती. त्याचे वितरण यापूर्वीच झाले होते. त्याच रोपांचे आज रोपण करण्यात आले.
वन विभाग, सामाजिक वनीकरण विभाग, शिवाजी विद्यापीठ व कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्ष लागवड मोहिमेचा शुभारंभ तसेच वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्त कृषी सप्ताहाचा शुभारंभ पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते विद्यापीठ परिसरात करण्यात आला. या वेळी पालक सचिव राजगोपाल देवरा, जिल्हा पोलीस अधीक्षक प्रदीप देशपांडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमणार, मुख्य वन संरक्षक तथा क्षेत्रीय संचालक सह्याद्री व्याघ्र राखीव क्षेत्र डॉ. व्ही. क्लेमेंट बेन यांची प्रमुख उपस्थिती होती.
वृक्ष लागवडीबद्दल लोकांमध्ये झालेली जाणीव जागृती पाहिली तर आज राज्यात २ कोटी ऐवजी ४ कोटी वृक्ष लागवड होईल, असा विश्वास पालकमंत्री पाटील यांनी व्यक्त केला. खासदार धनंजय महाडिक यांनी धनंजय महाडिक युवक शक्तीच्या वतीने २० हजार झाडे लावण्यात येणार असल्याचे सांगितले. कुलगुरू डॉ. देवानंद िशदे यांनी शिवाजी विद्यापीठ परिसरात सध्या १३ हजार झाडे असून आज ५ हजार झाडे लावण्यात येणार असल्याचे सांगितले. शिवाजी विद्यापीठ हे महाराष्ट्रातील पहिले एन्व्हायरमेंट ऑडिट करणारे विद्यापीठ असल्याचे सांगितले.
जिल्हाधिकारी डॉ. सनी यांनी जिल्ह्याने ६ लाख वृक्ष लागवडीच्या उद्दिष्टाच्या तुलनेत ५८०० जागांवर ८ लाख खड्डय़ांमधून वृक्ष लागवड करून १३३ टक्के उद्दिष्ट पूर्ण केल्याचे सांगितले.