एकतर्फी प्रेमातून वारंवार होणाऱ्या छेडछाडीला कंटाळून बोंद्रेनगर धनगरवाड येथील पल्लवी गणपती बोडेकर (वय १७) या तरुणीने घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याप्रकरणी करवीर पोलिसांनी सोमवारी सहा जणांना अटक केली आहे. मानसिक छळ करून, आत्महत्येस प्रवृत्त करणे या कलमांन्वये संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
संजय सोनबा शेळके (वय १९), पांडुरंग बाबुराव शेळके (वय १९), बबन नागू शेळके (वय ३२), राजू सोनबा शेळके (वय २३), चोंदू गणपती बोडके, देवू ऊर्फ देवाप्पा गणपती बोडके (वय २२, रा. धनगरवाडा, बोंद्रेनगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
पल्लवी ही आपली लहान बहीण निकिता आणि आजीसह बोंद्रेनगर धनगरवाड येथे राहात होती. निकिताचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी पल्लवी काही ठिकाणी धुण्याभांडय़ाची कामे करून आपला उदरनिर्वाह करीत होती. धनगरवाड परिसरातील देवू बोडके हा आपल्या साथीदारांसह पल्लवीची छेडछाड करत असे. यासंदर्भात पल्लवीच्या नातेवाइकांनी व परिसरातील नागरिकांनी संबंधितांना समज दिली होती.
रविवारी सायंकाळी पल्लवी काम आटोपून घरी येत असताना नागाळा पार्क येथे देवाप्पा बोडकेसह अन्य पाच जणांनी तिची छेड काढली. यामुळे पल्लवी प्रचंड दडपणाखाली होती. घरी आल्यानंतर तिने बहीण निकिताला किराणा आणण्यास दुकानात पाठवले.
याच दरम्यान तिने घरी ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. निकिता दुकानातून घरी परतल्यानंतर पल्लवीने दार उघडले नाही. शेजाऱ्यांच्या मदतीने दार तोडून आत प्रवेश केला असता पल्लवीने ओढणीने गळफास लावून आत्महत्या केल्याचे दिसले. तिच्या मृतदेहाजवळ सुसाईड नोट मिळून आली होती. त्यामध्ये देवू बोडके हा आपल्या साथीदारांसह आपणास वारंवार त्रास देत असे. यास कंटाळून आत्महत्या करत असल्याचे चिठ्ठीत लिहिले होते. यानंतर संतप्त जमावाने संशयिताच्या घरावर हल्ला करून तोडफोड केली होती.