पाच वेळा विश्वविजेत्या ठरलेल्या विश्वनाथन आनंदने आव्हानवीर बुद्धिबळ स्पर्धेत जेतेपद पटकावण्याच्या दिशेने दमदार पाऊल टाकले. महत्त्वपूर्ण टप्प्यावर पोहोचलेल्या आनंदने पीटर स्विडलरविरुद्धच्या सातव्या फेरीत बरोबरी पत्करली. आनंदने सलग चौथा सामना बरोबरीत राखत या स्पर्धेत ४.५ गुणांसह अग्रस्थान कायम ठेवले आहे.
स्पर्धेचा पहिला टप्पा पार पडला असून आनंदला पुढील सातपैकी चार फेऱ्यांमध्ये पांढऱ्या मोहऱ्यांसह खेळावे लागणार आहे. त्यामुळे जेतेपदासाठी आनंदचे पारडे जड मानले जात आहे. बल्गेरियाच्या व्हेसेलिन टोपालोव्हला रशियाच्या दिमित्री आंद्रेकीनने पराभवाचा धक्का दिला. रशियाच्या व्लादिमिर क्रॅमनिकने अझरबैजानच्या शाख्रीयार मामेद्यारोव्हविरुद्ध विजय मिळवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. अखेर त्याला विजय मिळवण्यात यश मिळाले. बल्गेरियाच्या लेव्हॉन अरोनियनने रशियाच्या सर्जी कार्याकिनला हरवत आनंदला गाठले आहे.
स्विडलरने आनंदविरुद्ध राय लोपेझ पद्धतीने डावाला सुरुवात केली. आनंदनेही बर्लिन बचाव पद्धतीने त्याला उत्तर दिले. आनंदने डावाच्या मध्यात घोडय़ाच्या साहाय्याने जलद चाली करत स्विडलरच्या राजाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. महत्त्वाच्या क्षणी आनंदने प्यादे मिळवत लढतीवर वर्चस्व गाजवले. अखेर स्विडलरने बरोबरीवर धन्यता मानली.
सहाव्या फेरीतील निकाल :
विश्वनाथन आनंद बरोबरी वि. पीटर स्विडलर
दिमित्री आंद्रेकीन विजयी वि. व्हेसेलिन टोपालोव्ह
लेव्हॉन अरोनियन विजयी वि. सर्जी कार्याकिन
व्लादिमिर क्रॅमनिक विजयी वि. शाख्रीयार मामेद्यारोव्ह

गुणतालिका
खेळाडू        गुण
विश्वनाथन आनंद    ४.५
लेव्हॉन अरोनियन    ४.५
व्लादिमिर क्रॅमनिक    ४
पीटर स्विडलर    ३.५
शाख्रीयार मामेद्यारोव्ह    ३
दिमित्री आंद्रेकीन    ३
व्हेसेलिन टोपालोव्ह    ३
सर्जी कार्याकिन    २.५

स्विडलरचा बरोबरीचा पर्याय योग्यच होता. काही जण पराभवाच्या छायेत असताना बरोबरीचा पर्याय समोर ठेवतात. पण स्विडलर हा धूर्त खेळाडू नक्कीच नाही. म्हणून मी त्याचा बरोबरीचा पर्याय स्वीकारला. आज मला सर्वोत्तम खेळ साकारता आला नाही!
विश्वनाथन आनंद