नवी दिल्ली : जगातील सर्वोत्तम अपंग धावपटू आज, शनिवारपासून सुरू होणाऱ्या सर्वांत मोठ्या जागतिक पॅरा-ॲथलेटिक्स स्पर्धेत धैर्य आणि लवचीकता दाखवून सर्वांचे लक्ष वेधून घेण्यासाठी सज्ज आहेत. राजधानी दिल्लीतील प्रतिष्ठेच्या जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये ही स्पर्धा ५ ऑक्टोबरपर्यंत चालणार असून यात यजमान भारताचे आजवरच्या सर्वोत्तम कामगिरीचे लक्ष्य असेल.
नऊ दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत १०४ देशांतील २२०० खेळाडू आणि अधिकारी सहभागी होणार आहेत. भारतात होणारी ही जागतिक स्पर्धा इतिहासातील सर्वांत मोठी ठरणार असून, भारताने या १२व्या आवृत्तीसाठी खेळाडूंना सर्वोच्च दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. कतार, संयुक्त अरब अमिराती आणि जपाननंतर या प्रतिष्ठित स्पर्धेचे आयोजन करणारा भारत चौथा आशियाई देश ठरला आहे.
या स्पर्धेत सर्वोत्तम पॅरा-खेळाडू १८६ पदकांसाठी आपले कौशल्य पणाला लावतील. गेल्या वर्षी जपानमध्ये झालेल्या स्पर्धेपेक्षा यंदा १५ अधिक पदके दिली जाणार आहेत. या स्पर्धेत नवे जागतिक विक्रम नोंदवले जातील, नवे विजेते मिळतील असा विश्वास व्यक्त करून जागतिक पॅरा ॲथलेटिक्सचे अध्यक्ष पॉल फिट्झगेराल्ड यांनी स्पर्धेसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या सुविधांबाबत भारताचे कौतुक केले.
द्विस्तरीय रबर असलेला आणि एकसमान लवचीकता देणारा मोंडो ट्रॅक या स्पर्धेचे आकर्षण ठरणार आहे. अशा पद्धतीच्या ट्रॅकवर खेळाडू घसरून पडत नाहीत. तसेच सर्वोत्तम दर्जाचे तंदुरुस्ती केंद्रही मैदानात उभारण्यात आले आहे.
जर्मनीचा ब्लेड जम्पर मार्कस रेहम, स्वित्झर्लंडचा व्हिलचेअर धावपटू कॅथरिन डेबरनर, ब्राझीलचा वेगवान धावपटू पेट्रुसिओ फरेरा, लांब उडीत चार पॅरालिम्पिक आणि सात जागतिक सुवर्णपदके मिळविणारी उडी प्रकारातील खेळाडू रेहम हिच्या कामगिरीकडे लक्ष असेल. अशा या मोठ्या जागतिक स्पर्धेतही आपले कौशल्य दाखविण्यास भारतीय मागे राहणार नाहीत. सुमित अंतिल, प्रवीण कुमार, दीप्ती जीवनी, सचिन खिलारी, एकता भान, सिमरन शर्मा या भारतीय खेळाडूंच्या कामगिरीकडे सर्वांच्या नजरा लागून असतील.
सर्वांत मोठा संघ : या स्पर्धेसाठी भारताने आतापर्यंतचा सर्वांत मोठा ७४ खेळाडूंचा संघ तैनात केला आहे. गेल्या दोन आवृत्त्या आणि पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारताच्या कामगिरीत सुधारणा दिसत असल्यामुळे या वेळी २० हून अधिक पदकांची भारतीय संघ अपेक्षा ठेवून आहे. भारताने दुबईत (२०१९) नऊ पदके, पॅरिसमध्ये (२०२३) दहा पदके, तर जपानमध्ये (२०२४) १७ पदकांची कमाई केली होती.