नवी दिल्ली : भारतीय हॉकी संघाचे माजी गोलरक्षक आणि १९७२ म्युनिक ऑलिम्पिक स्पर्धेतील कांस्यपदक विजेत्या संघाचे सदस्य मॅन्युएल फ्रेडरिक यांचे शुक्रवारी बंगळूरु येथे निधन झाले. ते ७८ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात दोन मुली आहेत.

गेल्या दहा महिन्यांपासून ते प्रोस्टेट कर्करोगाने आजारी होते. कन्नूरमधील बर्नासेरी येथे जन्मलेले फ्रेडरिक हे केरळमधील ऑलिम्पिक पदकविजेते पहिले खेळाडू होते. त्यांच्यानंतर पुन्हा एकदा गोलरक्षक असलेलाच पी. आर. श्रीजेश हा केरळमधील अन्य ऑलिम्पिक पदकविजेता हॉकीपटू ठरला होता.

वर्षभरापूर्वी पत्नी शीतला यांचे निधन झाल्यापासून फ्रेडरिक यांना नैराश्य आले होते. ते गेले दहा महिने कर्करोगाने ग्रस्त होते. त्यांना वाचवण्यासाठी आम्ही सर्व प्रयत्न केले. मात्र, उपचारादरम्यान त्यांना कावीळ झाली आणि त्यांचा यकृतावर परिणाम झाला. त्यामुळे प्रकृती अधिक खालावली आणि शुक्रवारी सकाळी त्यांचे निधन झाले,’’ अशी माहिती मुलगी फ्रेशना हिने दिली.

निर्भय आणि गोलरक्षणातील सहजता यासाठी फ्रेडरिक यांना हॉकीविश्वात ‘टायगर’ या नावाने ओळखले जायचे. पेनल्टी स्ट्रोकचे रक्षण करण्याचे त्यांचे कौशल्य सर्वोत्तम होते. यामुळेच त्यांना खरी प्रतिष्ठा मिळाली. नेदरलँड्समध्ये १९७३ आणि अर्जेंटिनात १९७८ मध्ये झालेल्या दोन विश्वचषक स्पर्धांत फ्रेडरिक भारतीय संघाचे सदस्य होते. यात १९७३ मध्ये भारतीय संघ रौप्यपदकाचा मानकरी ठरला होता. त्यांनी सात वर्षे भारताचे प्रतिनिधित्व केले. फ्रेडरिक यांना २०१९ मध्ये ध्यानचंद जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले होते.

‘हॉकी इंडिया’ने त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. फ्रेडरिक हे सर्वोच्च स्तराचे गोलरक्षक होते. भारतीय हॉकीच्या गौरवशाली परंपरेत त्यांनी दिलेले योगदान कायम लक्षात राहील, अशी भावना ‘हॉकी इंडिया’चे अध्यक्ष दिलीप तिर्की यांनी व्यक्त केली. हॉकी जगतासाठी हा अत्यंत दुःखद दिवस आहे. फ्रेडरिक यांची समर्पित भावना कायमच तरुणांना त्यांच्या स्वप्नांवर विश्वास ठेवण्यास प्रेरित करेल, असे ‘हॉकी इंडिया’चे सचिव भोलानाथ सिंह म्हणाले.