3 Afghan Cricketers Killed In Pakistani Airstrike: पाकिस्तानच्या लष्कराने पक्तिका प्रांतात केलेल्या कथित हवाई हल्ल्यात अफगाणिस्तानच्या तीन स्थानिक क्रिकेटपटूंचा मृत्यू झाल्यानंतर, अफगाणिस्तान क्रिकेट मंडळाने पाकिस्तान आणि श्रीलंकेसह होणाऱ्या आगामी तिरंगी टी-२० मालिकेतून माघार घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे. सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका पत्रकात, एसीबीने या घटनेचा निषेध केला आणि याचे “पाकिस्तानने केलेला भ्याड हल्ला” असे वर्णन केले आहे.
५ ते २९ नोव्हेंबर दरम्यान लाहोर आणि रावळपिंडी येथे होणाऱ्या तिरंगी मालिकेत अफगाणिस्तान संघ सहभागी होणार होता, ज्यामध्ये पाकिस्तानसह श्रीलंकेचाही समावेश आहे.
अफगाणिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार रशीद खानने या “क्रूर” हवाई हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. त्याने तिरंगी मालिकेतून माघार घेण्याच्या अफगाणिस्तान क्रिकेट मंडळाच्या निर्णयाला पाठींबा दिला आहे.
रशीद खान आपल्या पोस्टमध्ये म्हणाला की, “पाकिस्तानने केलेल्या हवाई हल्ल्यात अनेक नागरिकांचे मृत्यू झाल्याने मी दु:खी आहे. या हल्ल्यात महिला, मुले आणि जागतिक स्तरावर आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या इच्छुक तरुण क्रिकेटपटूंचा मृत्यू झाला आहे.”
“निष्पाप जीव गमावल्याच्या पार्श्वभूमीवर, पाकिस्तानविरुद्धच्या आगामी क्रिकेट सामन्यांमधून माघार घेण्याच्या एसीबीच्या निर्णयाला माझा पाठींबा आहे. या कठीण काळात मी आमच्या नागरिकांसोबत आहे, आपली राष्ट्रीय प्रतिष्ठा महत्त्वाची आहे”, असे रशीद खानने पुढे म्हटले आहे.
“या हृदयद्रावक घटनेत, उरगुन जिल्ह्यातील कबीर, सिबगतुल्लाह आणि हारून या तीन क्रिकेटपटूंसह इतर ५ देशबांधव शहीद झाले असून, इतर सात जण जखमी झाले आहेत”, असे एसीबीने शनिवारी एका निवेदनात म्हटले आहे.
११ ऑक्टोबर रोजी अफगाणिस्तानच्या तालिबान सैन्याने पाकिस्तानी लष्करी चौक्यांवर हल्ले केल्यानंतर दोन्ही देशांत लष्करी संघर्ष सुरू झाला आहे.
दरम्यान, ४८ तासांपूर्वी अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमध्ये शस्त्रविराम झाला होता. पण पाकिस्तानने अफगाणिस्तानच्या पक्तिका प्रांतात हवाई हल्ले केल्याने हा शस्त्रविराम अल्पकालीन ठरला आहे. पाकिस्तानने ड्युरंड रेषेवरील अफगाणिस्तानच्या अर्गुन आणि बर्मल जिल्ह्यांमधील निवासी भागांवर हल्ले केल्याचा आरोप आहे. तालिबानने या हल्ल्यांचा शस्त्रविरामाचे उल्लंघन म्हणून निषेध केला आहे.