Fox entering Hampshire vs Surrey live match video viral : सध्या ब्रिटनमध्ये व्हिटॅलिटी टी-२० ब्लास्ट ही स्पर्धा खेळवली जात आहे. टी-२० ब्लास्टमधील लाइव्ह मॅचदरम्यान एक असे दृश्य पाहायला मिळाला, ज्यामुळे खेळांडूसह सर्वच आश्चर्यचकित झाले. वास्तविक, एक कोल्हा मैदानात घुसला आणि ज्यामुळे खेळाडू घाबरले. लंडन येथील मैदानावर हॅम्पशायर विरुद्ध सरे झालेल्या सामन्यात ही घटना घडली. आता या कोल्ह्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र, या कोल्ह्याने कोणालाही इजा केली नाही.

हा कोल्हा मैदानात घुसल्यानंतर सतत इकडे-तिकडे धावत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. या घटनेमुळे सामना काही काळ थांबवावा लागला होता. विशेष म्हणजे या कोल्ह्याला मैदानाबाहेर काढण्यासाठी कोणतीही गरज पडली नाही. कारण कोल्ह्याने स्वतःचा मार्ग स्वतःच शोधला आणि काही वेळातच मैदानाच्या बाहेर निघून गेला. दरम्यान कोल्ह्याला अचानक मैदानात पाहून प्रेक्षकांना हसू आवरता आले नाही. यावेळी काही प्रेक्षकांनी शिट्ट्याही वाजवल्या.

लाइव्ह सामन्यात कोल्हा घुसल्याचा व्हिडीओ व्हायरल –

आता या व्हायरल झालेल्या व्हिडीओवर यूजर्सच्या अनेक प्रतिक्रिया येत आहेत. एका युजर्सने लिहिले की, ‘क्रिकेट मॅचमध्ये साप, कुत्रा आणि माशीनंतर आता येथे सादर आहे कोल्हा.’ काहींनी मजेशीर कमेंट्स केल्या. दुसऱ्या युजर्सने लिहिले, ‘असे दिसते की कोल्ह्याला बॅटिंग लाइनअपमध्ये सामील व्हायचे होते. कदाचित तो एक चांगला क्षेत्ररक्षक असू शकतो.’ तिसऱ्याने लिहिले, ‘आजकाल कोल्हा देखील काही धावा करण्याचा प्रयत्न करत आहे असे दिसते.”

सॅम करनने झळकावले टी-२० क्रिकेटमधील पहिले शतक –

सामन्याबद्दल बोलायचे तर हॅम्पशायर विरुद्ध सरे सामना हाय स्कोअरिंग आणि रोमांचक होता. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना हॅम्पशायर संघाने १८४ धावांचे लक्ष्य ठेवले, ज्याचा सरेने पाच चेंडू बाकी असताना पाठलाग केला. सरे संघाने पाच गडी राखून विजय मिळवला. सरेसाठी अष्टपैलू सॅम करनने झंझावाती शतक झळकावले. त्याने ५८ चेंडूंचा सामना करताना नाबाद १०२ धावांची खेळी साकारली. करनने आपल्या खेळीत सात चौकार आणि सहा षटकार मारले. विशेष म्हणजे करणचे हे टी-२० क्रिकेटमधील पहिले शतक आहे.