AB De Villiers Stunning Relay Catch of Yusuf Pathan Video: सध्या वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजेंड्स ही स्पर्धा खेळवली जात आहे. या स्पर्धेत जगभरातील दिग्गज खेळाडू आपल्या राष्ट्रीय संघाकडून खेळत आहे. यादरम्यान दक्षिण आफ्रिका लिजेंड्स वि. इंडिया लिजेंड्स सामन्यात एबी डिविलियर्सने टिपलेल्या कमालीच्या रिले झेलने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. डिविलियर्सने या सामन्यात कमालीच्या फटकेबाजीनंतर शानदार क्षेत्ररक्षणही केलं आहे. त्याच्या या रिले झेलचा व्हीडिओ सध्या व्हायरल होत आहे.

डिविलियर्सने या सामन्यात ३० चेंडूत नाबाद ६३ धावांची वादळी खेळी केली, यासह संघाला ६ बाद २०८ धावांपर्यंत नेण्यात मोठी भूमिका बजावली. यानंतर डिव्हिलियर्सने उत्कृष्ट क्षेत्ररक्षण करत इम्रान ताहिरच्या गोलंदाजीवर युसूफ पठाणचा झेल टिपत सर्वांनाच आश्चर्यचकित केलं. डिव्हिलियर्सचा झेल पाहून कोणीही म्हणणार नाही की तो ४१ वर्षांचा आहे आणि ४ वर्षांनी मैदानावर त्याने पुनरागमन केलं आहे.

युसूफ पठाणने इमरान ताहिरच्या गुगली चेंडूवक वाइड लॉन्ग-ऑनच्या दिशेने फटका खेळला. एबीने धावत असताना चेंडू सीमारेषेजवळ पकडला आणि तो सरेल एर्वीकडे हवेत फेकला आणि त्याने कोणतीही चूक न करता एबीने थ्रो केलेला चेंडू शानदारपणे टिपला. यासह युसूफ पठाणची ५ धावांची खेळी संपुष्टात आली.

काउंटी ग्राउंडवर झालेल्या दक्षिण आफ्रिका चॅम्पियन्स संघाने इंडिया चॅम्पियन्सवर ८८ धावांनी विजय नोंदवला. या सामन्याचा सामनावीर पुरस्कार एबी डिव्हिलियर्सला देण्यात आला. २०९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंडिया चॅम्पियन्स संघाला फक्त ९ बाद १११ धावाच करता आल्या. गतविजेत्या इंडिया चॅम्पियन्सने त्यांच्या मोहिमेची सुरुवात मोठ्या पराभवाने केली आहे. पाकिस्तान चॅम्पियन्सविरुद्धचा त्यांचा पहिला सामना रद्द झाला. शिखर धवन आणि सुरेश रैनासारख्या अनुभवी खेळाडूंनी पाकिस्तानविरूद्ध सामना खेळण्यातून माघार घेतली.

युवराज सिंगच्या नेतृत्वाखालील इंडियन चॅम्पियन्स संघाची फलंदाजी पूर्णपणे अपयशी ठरली आणि पॉवरप्लेमध्ये त्यांनी चार विकेट गमावल्या. स्टुअर्ट बिन्नी हा एकमेव फलंदाज होता ज्याने ३९ चेंडूत ३७ धावा करत चांगली कामगिरी केली. दक्षिण आफ्रिका चॅम्पियन्सने त्यांचा दुसरा विजय नोंदवला. यापूर्वी त्यांनी वेस्ट इंडिज चॅम्पियन्सला बॉल आऊटच्या पद्धतीने पराभूत केलं.