Abrar Ahmed on Virat Kohli ICC Champions Trophy : चॅम्पियन्स करंडक स्पर्धेत गेल्या आठवड्यात भारत विरुद्ध पाकिस्तान या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमधील सामन्यात भारताने पाकिस्तानवर सहा गडी राखून विजय मिळवला. या सामन्यापासून पाकिस्तानचा फिरकीपटू अबरार अहमद चर्चेत आहे. एका बाजूला मैदानातील वर्तनामुळे त्याच्यावर टीका चालू आहे तर दुसऱ्या बाजूला त्याच्या उत्तम गोलंदाजीमुळे त्याचं कौतुकही होत आहे. शतकवीर विराट कोहलीने देखील अबरारच्या कोट्यातील १० षटकं पूर्ण झाल्यावर त्याच्याशी हस्तांदोलन केलं होतं, त्याच्या उत्तम गोलंदाजीसाठी त्याची पाठ थोपटली होती. त्यामुळे विराटवर त्याच्या खिलाडूवृत्तीबद्दल कौतुकाचा वर्षाव होत आहे. दरम्यान, मैदानात भुवई उंचावून शुभमन गिलला डोळे दाखवणारा, त्याला पॅव्हेलियनची वाट दाखवणाऱ्या अबरारचा आता सूर बदलला आहे. त्याने समाजमाध्यमांवर एक पोस्ट करून मवाळ भूमिका घेतली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात अबरारने शुभमन गिलला बाद केलं होतं. त्यानंतर त्याने आपली एक भुवई तिरकसपणे उंचावून शुबमन गिलला पॅव्हेलियनमध्ये परतण्याचा इशारा केला. मैदानात त्याने केलेली ही कृती कॅमेरात कैद झाली. यानंतर अबरारला समाजमाध्यमांवर ट्रोल झाला. दरम्यान, आता अबरारचा सूर मवाळ झाला आहे. त्याने इन्स्टाग्रामवर भारताचा दिग्गज क्रिकेटपटू विराट कोहलीच्या फोटोसह एक पोस्ट शेअर केली आहे. तसेच विराट हा त्याचा लहानपणापासूनचा हिरो असल्याचं त्याने म्हटलं आहे.

अबरारने समाजमाध्यमावर केलेल्या पोस्टमध्ये काय म्हटलंय?

अबरारने त्याच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की “माझा लहानपणापासूनचा हिरो असलेल्या विराट कोहलीसमोर गोलंदाजी करणं आणि त्याच्याकडून माझं कौतुक होणं हे माझ्यासाठी खूपच रोमांचकारी आहे. तो एक क्रिकेटपटू म्हणून जितका मोठा आहे तितकंच त्याचं मन मोठं आहे. तो मैदानावर असो अथवा मैदानाबाहेर तो सर्वांसाठी एक मोठा प्रेरणास्त्रोत आहे”.

विराटची खिलाडूवृत्ती

अबरार शुभमन गिलबरोबर ज्या प्रकारे वागला त्या कृतीमुळे त्याच्यावर टीका होत असली तरी त्याने भारताविरोधात उत्कृष्ट गोलंदाजी केली होती हे नाकारून चालणार नाही. त्याच्या गोलंदाजीचा सामना करणाऱ्या भारतीय फलंदाजांनाही त्याची जाणीव आहे. त्यामुळेच अबरारची १० षटकं पूर्ण झाल्यानंतर विराट कोहलीने त्याची पाठ थोपटली. अबरारने या सामन्यात त्याच्या कोट्यातील १० षटकांत केवळ २८ धावा देत एक गडी बाद केला. त्याच्यासमोर भारतीय फलंदाज अडखळत खेळत होते. कोणत्याही फलंदाजाने त्याच्याविरोधात मोठा फटका खेळण्याचा धोका पत्करला नाही. त्यामुळेच विराटने त्याची पाठ थोपटली. दुसऱ्या बाजूला अबरारव्यतिरिक्त इतर कोणत्याही पाकिस्तानी गोलंदाजाला भारतीय फलंदाजांनी डोकं वर काढण्याची संधीच दिली नाही. शाहीन आफ्रिदीने दोन बळी घेतले खरे मात्र, त्याच्या ८ षटकात भारतीय फलंदाजांनी ७४ धावांची लयलूट केली. तर, खुशदील शाहने ७.३ षटकांत ४३ धावा देत १ बळी घेतला. इतर गोलंदाजांना एकही बळी घेता आला नाही.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Abrar ahmed wrote post for virat kohli call childhood hero ind vs pak asc