तब्बल ८ वर्षांच्या दीर्घ प्रतिक्षेनंतर पाकिस्तानात पुन्हा एकदा आंतराष्ट्रीय क्रिकेटचे सामने खेळवले जाणार आहेत. World XI विरुद्ध पाकिस्तान या संघांमध्ये लवकरच मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेला आयसीसीने परवानगी दिली असून, खबरदारीचा उपाय म्हणून पाकिस्तान क्रिकेट बोर्ड खेळाडूंसाठी राष्ट्रपती दर्जाच्या सुरक्षेची व्यवस्था करणार आहे. दक्षिण आफ्रिकेच्या फाफ डू प्लेसीकडे World XI संघाचं नेतृत्व सोपवण्यात आलंय. वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार डॅरेन सॅमीचाही या संघात समावेश करण्यात आला आहे.

या निवडीनंतर डॅरेन सॅमी सध्या भलताच खूश आहे. पाकिस्तानात क्रिकेट पुन्हा सुरु होण्यात आपला हातभार लागेल याचा आपल्याला आनंद असल्याचं सॅमीने म्हणलं आहे. याचवेळी सर्व देश पुढे पाकिस्तानचा दौरा करतील, असा आत्मविश्वास सॅमीने व्यक्त केला आहे.

“माझ्या माहितीनुसार श्रीलंका आणि वेस्ट इंडिजचे संघ पाकिस्तानचा दौरा करणार आहेत. जर सरकार आणि सुरक्षा यंत्रणांनी खेळाडूंसाठी एक सुरक्षित वातावरण तयार केलं, तर पाकिस्तानात लवकरच क्रिकेटचे दौरे सुरु होतील. सध्या देशात क्रिकेट पूर्वपदावर आणण्यासाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्ड प्रयत्न करत आहे. या कामात माझाही हातभार लागत असल्याने मला खूप आनंद होतोय.”

याआधी डॅरेन सॅमी पाकिस्तान सुपर लिग स्पर्धेत पेशावर संघाकडून खेळला होता. गदाफी स्टेडियमवर झालेल्या एकतर्फी अंतिम सामन्यात पेशावरच्या संघाने क्वेट्टा संघावर मात करुन स्पर्धेचं विजेतेपद पटकावलेलं होतं. सध्या भारत आणि पाकिस्तान या दोन पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये एकही सामना खेळवला जात नाहीये. सीमेपलीकडून पाकिस्तानी सैन्याकडून होणारा गोळीबार, दहशतवादाला पाकिस्तानात दिला जाणारा आसरा यावरुन भारताने पाकिस्तानशी क्रिकेट खेळण्यास नकार दिला. त्यामुळे सॅमीने वर्तवलेलं भविष्य खरं होतं का हे पहावं लागणार आहे.