‘तुमची खरंच ताकद असेल तर भारत-पाकिस्तान सामन्याच्या प्रक्षेपणातून जो पैसा कमावलात, जाहिरातीतून पैसा मिळाला आणि एकूणच या सामन्याद्वारे जेवढा पैसा उभारला तेवढा पहलगाम हल्ल्यातील पीडितांच्या विधवांना द्या. तर आम्ही मानू की तुम्ही पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांच्या पाठीशी खरंच उभे आहात’, असं वक्तव्य आम आदमी पार्टीचे नेते सौरभ भारद्वाज यांनी केलं. रविवारी झालेल्या भारत-पाकिस्तान लढतीच्या निमित्ताने विविध वादांना तोंड फुटलं आहे.
भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने पाकिस्तानविरुद्धच्या लढतीनंतर आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे आहोत. आम्ही हा विजय भारतीय लष्कराला समर्पित करतो असं सूर्यकुमार म्हणाला होता. भारतीय संघाने या सामन्यात हस्तांदोलन टाळलं होतं. सूर्यकुमारच्या वक्तव्याला उद्देशून भारद्वाज म्हणाले, ‘खरंच ताकद आहे, बीसीसीआयची ताकद आहे आणि आयसीसीचीही ताकद आहे तर आम्ही तुम्हाला दुसरं आव्हान देतो. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यातून जो पैसा मिळाला, प्रक्षेपण हक्कातून जो पैसा मिळाला, जाहिरातीतून मिळाली तो सगळा एकत्र करा आणि पहलगाम पीडितांच्या विधवांना द्या. तेव्हाच आम्ही मानू की तुम्ही पीडितांच्या पाठीशी आहात’.
‘त्यांच्यात एवढी धमक नाही. आम्ही पाठीशी आहोत, विजय समर्पित करतो असं फक्त म्हणतात’, असं भारद्वाज म्हणाले. आशिया चषकात भारताने पाकिस्तानविरुद्ध खेळण्यासंदर्भात विरोधी पक्षांनी सरकारवर टीकेची झोड उठवली होती. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान म्हणाले की एकीकडे सामन्याला परवानगी दिली जाते पण धार्मिक स्थळाला भेट देण्यासाठी परवानगी नाकारली जाते.
उद्धव ठाकरे यांनीही भाजपाच्या भूमिकेवर टीका केली होती. ‘पाकिस्तान हे दहशतावादाचं आगार आहे हे सगळ्यांना कळून चुकलं आहे. मग त्यांच्याशी खेळण्याचा प्रश्न येतोच कुठे? हाच का तुमचा राष्ट्रवाद’, असा सवाल ठाकरे यांनी केला होता.
एप्रिल महिन्यात जम्मू काश्मीर मधल्या पहलगाम इथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ नागरिकांनी प्राण गमावले होते.याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय लष्कराने ऑपरेशन सिंदूर मोहीम हाती घेतली. या मोहिमेअंतर्गत भारतीय लष्कराने पाकिस्तानमधले दहशतवादी तळ उद्धव्सत केले. यानंतर भारत-पाकिस्तान सामना होणार का याविषयी साशंकता होती. मात्र केंद्र सरकारने यासंदर्भात भूमिका स्पष्ट केली. आयसीसी तसंच आशिया चषक यासारख्या स्पर्धांमध्ये भारतीय संघ पाकिस्तानविरुद्ध खेळेल मात्र द्विराष्ट्रीय मालिका होणार नाही. रविवारी झालेला सामना पहलगाम हल्ल्यानंतरचा पहिलाच होता.
पाकिस्तान लढतीत भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादव आणि पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली अघा यांनी नाणेफेकीच्या वेळेस हस्तांदोलन केलं नाही. सामना संपल्यानंतर भारतीय संघाने पाकिस्तानच्या खेळाडूंशी हस्तांदोलन नाकारलं. या प्रकारामुळे नाराज होऊन पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली अघा पुरस्कार वितरण सोहळ्याला उपस्थित राहिला नाही. पत्रकार परिषदेला त्याच्याऐवजी प्रशिक्षक माईक हेसन उपस्थित होते. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने हे प्रकरण पुढे रेटत सामनाधिकाऱ्यांना लक्ष्य केलं. पायक्रॉफ्ट यांनी हस्तांदोलन करू नका अशी सूचना दिल्याचा आरोप पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने केला. पायक्रॉफ्ट यांची तातडीने हकालपट्टी करावी अशी मागणी पीसीबीने केली होती. मागणी पूर्ण न झाल्यास उर्वरित सामन्यांवर बहिष्कार टाकण्याचा इशारा पाकिस्तानने दिला. तूर्तास पीसीबीची पायक्रॉफ्ट नको ही मागणी पूर्ण झाली आहे. त्यांच्याऐवजी रिची रिचर्डसन सामनाधिकारी म्हणून काम पाहतील.