23 Year Old Cricketer Died in Ahmedabad Plane Crash: १२ जूनला अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या विमानाचा दुर्देवी अपघात झाला. ज्यामध्ये तब्बल २४१ प्रवाशांचा मृत्यू झाला. एअर इंडियाच्या एआय-१७१ (बोइंग ७८७-८ ड्रीमलायनर विमान – सीरियल नंबर ३६२७९) या प्रवासी विमानाचा अपघात झाला. २४२ प्रवाशांना घेऊन हे विमान अहमदाबादवरून लंडनला जात होतं. या प्रवाशांमध्ये एक युवा क्रिकेटपटूदेखील होता. त्याचाही या अपघातात दुर्देवी मृत्यू झाला आहे.
अहमदाबादहून लंडनला जाणारं विमान उड्डाण घेतल्यानंतर अवघ्या ३० सेकंदातच जमिनीवर कोसळलं. हे विमान मेघानीनगर परिसरातील मेडिकल कॉलेजच्या वसतिगृहावर कोसळलं. या भीषण अपघातात काही विद्यार्थ्यांचाही मृत्यू झाला. दरम्यान आता या विमान अपघातामध्ये गुजरातमधील एक युवा क्रिकेटपटूही होता आणि त्याचा दुर्देवी मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
अहमदाबाद विमान अपघातात मृत्यू पावलेला क्रिकेटपटू दीर्ध पटेल कोण आहे?
दीर्ध पटेला हा मूळचा गुजरातचा रहिवासी होती. तो यूकेमधील हडर्सफील्ड विद्यापीठात आर्टिफिशियल इंटेलिजेंसमध्ये पदव्युत्तर पदवी घेत होता. क्रिकेटच्या मैदानावरील एक प्रतिभावान अष्टपैलू खेळाडू असलेल्या पटेलने २०२४ च्या हंगामात लीड्स मॉडर्नियन्स क्रिकेट क्लबकडून खेळताना आपल्या खेळाने चांगली छाप पाडली होती. दीर्ध पटेल त्याचं पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करत असताना क्रिकेटची आवड देखील जोपासत होता. २०२४ मध्ये खेळताना त्याने फर्स्ट इलेव्हनच्या २० सामन्यांमध्ये ३१२ धावा केल्या आणि २९ विकेट्स घेतल्या होत्या.
लीड्स मॉडर्नियन्स क्रिकेट क्लबने दीर्ध पटेलच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत निवेदन जारी केलं आहे. दीर्ध पटेल खेळत असलेल्या या क्लबने त्याच्या निधनाबाबत लिहिले की, “क्लबमधील प्रत्येकाच्या भावना दिर्धच्या कुटुंबाबरोबर आणि त्याला ओळखणाऱ्या प्रत्येकासोबत आहेत. कायम उत्साहात आणि ऊर्जेचा स्त्रोत असलेल्या या प्रतिभावान खेळाडूची कायम आठवण येईल.”
एअरडेल अँड व्हार्फेडेल सीनियर क्रिकेट लीगने देखील दीर्ध पटेलच्या मृत्यूूबाबत पोस्ट शेअर केली आहे; ज्यामध्ये म्हटले आहे की, “काल अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडिया विमान अपघातात लीड्स मॉडर्नियन्स सीसीच्या दिर्ध पटेल याच्या निधनाची बातमी ऐकून लीगला अत्यंत दुःख झालं आहे. तो पूल सीसीचा माजी खेळाडू कृतिक पटेलचा भाऊ आहे. “
“लीड्स मॉडर्नियन्सने या आठवड्याच्या शेवटी त्यांच्या पहिल्या आणि दुसऱ्या सामन्यापूर्वी एक मिनिट मौन पाळत श्रध्दांजली देण्याचा निर्णय घेतला आहे. या अत्यंत दुःखद आणि कठीण काळात लीग कृतिक आणि पटेल कुटुंबाच्या सोबत आहे.”
एअर इंडियाच्या विमानाच्या या दुर्देवी अपघातामध्ये २४२ प्रवाशांपैकी फक्त एकच प्रवासी वाचला आहे. त्याच्याशिवाय इतर सर्व प्रवाश्यांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली. मृतांचे डीएनए टेस्ट करत त्यांचे पार्थिव त्यांच्या कुटुंबीयांकडे देण्यात आले. दरम्यान या विमान अपघाताचे पायलट कॅप्टन सुमित सभरवाल यांचं पार्थिव आज १७ जून रोजी त्यांच्या राहत्या घरी आणण्यात आले आणि त्यांच्या आई-वडिलांच्या उपस्थितीत त्यांच्या पार्थिवाला अखेरचा निरोप देण्यात आला.