मोहम्मद शमी, रविंद्र जाडेजा यांच्या भेदक माऱ्याच्या जोरावर विराट कोहलीच्या भारतीय संघाने विशाखापट्टणम कसोटीत पाचव्या दिवशी विजय संपादन केला. दुसऱ्या डावात आफ्रिकेला विजयासाठी ३९५ धावांचे आव्हान भारतीय संघाने दिले होते. भारतीय गोलंदाजांनी एकाही आफ्रिकन फलंदाजाला खेळपट्टीवर स्थिरावण्याचा वेळ दिला नाही. आक्रमक गोलंदाजी करत भारताने आफ्रिकेचा डाव १९१ धावांत गुंडाळला आणि भारताला २०३ धावांनी विजय मिळवून दिला.
हा सामना सुरू असतानाच भारताच्या कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे याला कन्यारत्नप्राप्ती झाली. त्याची पत्नी राधिकाने शनिवारी एका गोंडस मुलीला जन्म दिला. पण रहाणे त्याच्या मुलीच्या जन्माच्या वेळी भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघातील पहिल्या कसोटी सामन्यात व्यस्त होता. त्यामुळे त्याला त्याच्या पत्नीकडे आणि मुलीकडे जाता आले नव्हते. पण हा सामना संपल्यानंतर रहाणे त्याच्या मुलीला आणि पत्नीला भेटला. त्याने सोशल मीडियावर पत्नी राधिका आणि मुलीबरोबरचा फोटो पोस्ट केला आहे.
Hello pic.twitter.com/25oQyXOQeV
— Ajinkya Rahane (@ajinkyarahane88) October 7, 2019
हा फोटो पोस्ट करताना त्याने ‘हॅलो’ असे कॅप्शन टाकले आहे. हा फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. तोच फोटो अजिंक्यची पत्नी हिनेही इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.
दरम्यान, रहाणे त्याच्या मुलीला भेटल्यानंतर पुन्हा १० ऑक्टोबरपासून पुण्यात सुरु होणाऱ्या भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघातील दुसऱ्या कसोटी सामन्याआधी भारतीय संघात सामील होणार आहे.