एकीकडे देशात बिकट परिस्थिती असताना दुसरीकडे श्रीलंकेच्या क्रिकेट संघाने आपल्या देशवासियांना आनंदाचे क्षण उपभोगण्याची संधी दिली. वानिंदू हसरंगाची (३६ धावा व तीन बळी) अष्टपैलू चमक, डावखुऱ्या भानुका राजपक्षेची (नाबाद ७१) अप्रतिम खेळी आणि प्रमोद मदूशानच्या (चार बळी) भेदक माऱ्याच्या जोरावर श्रीलंकेने रविवारी अंतिम सामन्यात पाकिस्तानवर २३ धावांनी सरशी साधत सहाव्यांदा आशिया चषक क्रिकेट स्पर्धेचे जेतेपद पटकावले. या जेतेपदानंतर श्रीलंकेवर कौतुकाचा वर्षाव होत असतानाच भारतीय उद्योजक आनंद महिंद्रांनीही एका आगळ्यावेगळ्या ट्वीटमधून या विजयाचा आनंद साजरा केला आहे.

भारताचा कट्टर प्रतिस्पर्धी असणाऱ्या पाकिस्तानचा अंतिम सामन्यात पराभूत झाल्याने भारतीयांनी आनंद साजरा केला आहे. ट्विटरवरही अनेक हॅशटॅग आणि टॉपिक ट्रेण्ड होताना दिसले. असे असतानाच आनंद महिंद्रांनी मात्र पाकिस्तानच्या पराभवाचा आनंद झाला नसल्याचं म्हटलं आहे. श्रीलंकेच्या विजयाबद्दल आनंद महिंद्रांनी केलेली पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

“श्रीलंकेच्या विजयामुळे मला फार आनंद झाला आहे. मात्र पाकिस्तानचा पराभव व्हावा असं मला वाटत असल्याने हा आनंद झालेला नाही. तर श्रीलंकेचा विजय हा आपल्याला आठवण करुन देणार आहे की सांघिक खेळ हे सेलिब्रिटी खेळाडू किंवा सुपरस्टार्सबद्दल नसतात तर ते सांघिक योगदानाबद्दल आणि कौशल्याबद्दल म्हणजेच टीम वर्कबद्दल असतात,” असं आनंद महिंद्रांनी म्हटलं आहे.

दुबई येथे झालेल्या अंतिम सामन्यात  प्रथम फलंदाजी करणाऱ्या श्रीलंकेची अडखळती सुरुवात झाली. त्यांची ५ बाद ५८ अशी स्थिती होती. मात्र, राजपक्षेने एक बाजू लावून धरताना ४५ चेंडूंत सहा चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने नाबाद ७१ धावांची खेळी केली. त्याला हसरंगाची (२१ चेंडूंत ३६) उत्तम साथ लाभली. त्यामुळे श्रीलंकेने २० षटकांत ६ बाद १७० अशी धावसंख्या केली.

श्रीलंकेने दिलेल्या १७१ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानचा डाव २० षटकांत १४७ धावांत संपुष्टात आला. त्यांच्याकडून सलामीवीर मोहम्मद रिझवान (४९ चेंडूंत ५५) आणि इफ्तिकार अहमद (३१ चेंडूंत ३२) यांनी संयमाने फलंदाजी केली. मात्र, मोक्याच्या क्षणी ते बाद झाल्यावर इतरांना फारसे योगदान देता आले नाही. श्रीलंकेकडून वेगवान गोलंदाज मदूशानने ३४ धावांत चार, तर हसरंगाने २७ धावांत तीन बळी मिळवले.