Anshul Kamboj Maiden Test Wicket: मँचेस्टर कसोटीत भारताकडून नवा वेगवान गोलंदाज अंशुल कंबोजने पदार्पण केलं आणि त्याला पदार्पणाच्या पहिल्याच सामन्यात मोठी विकेट मिळाली आहे. भारताने मँचेस्टर कसोटीत पहिल्या डावात ३५८ धावा केल्या. तर प्रत्युत्तरात इंग्लंडच्या सलामीवीरांना वेगवान सुरूवात करत भारताच्या गोलंदाजांची चांगलीच शाळा घेतली. जॅक क्रॉली आणि बेन डकेटने अर्धशतकं झळकावत शतकी भागीदारी केली. पण अंशुलने डकेटला बाद करत संघाला मोठी विकेट मिळवून दिली.

अंशुल कंबोजला ‘AK47’ या नावाने देखील ओळखलं जात. त्याच्या नावाची पहिली दोन अक्षर आणि ४७ हा त्याचा जर्सी नंबर आहे. यासह अंशुल कंबोज त्याच्या वेगवान चेंडूसाठीही ओळखला जातो. वेगवान गोलंदाज असून तो त्याच्या वेगासाठी प्रसिद्ध आहे. अंशुल कंबोजच्या गोलंदाजीवर बेन डकेट कसा बाद झाला पाहूया.

भारताने केलेल्या ३५८ धावांच्या प्रत्युत्तरात फलंदाजी करताना इंग्लंडच्या सलामीवीरांनी वेगवान सुरूवात केली. जॅक क्रॉली आणि बेन डकेट यांनी पहिल्या विकेटसाठी १५८ धावांची भागीदारी जोडली. बॅझबॉल शैलीत फटकेबाजी करत या दोघांनीही वेगाने धावा करायला सुरूवात केली. रवींद्र जडेजाने आधी ३२व्या षटकात जॅक क्रॉलीला बाद केलं.

अंशुल कंबोजने मँचेस्टर कसोटीत पदार्पण केलं आणि गोलंदाजीत त्याला बुमराहनंतर दुसरं षटक टाकण्याची जबाबदारी मिळाली. अंशुल कंबोजच्या गोलंदाजीवर सुरूवातीला डकेटने चांगलीच फटकेबाजी केली. पण कंबोजने त्याला बाद करत बदला घेतला. कंबोजच्या ३९व्या षटकातील पहिल्या चेंडूवर डकेट बाद झाला. अंशुल कंबोजच्या वेगवान चेंडूवर डकेटने जोरदार फटका लगावण्यासाठी बॅट फिरवली, पण एक्स्ट्रा बाऊन्समुळे चेंडू बॅटची कड घेत यष्टीरक्षक ध्रुव जुरेलच्या हातात गेला आणि त्याने अफलातून झेल टिपला.

बेन डकेटच्या विकेटसह अंशुल कंबोजने कसोटी कारकिर्दीतील पहिली विकेट मिळवली. अंशुल कंबोजने पहिलीच विकेट मिळवताच गर्जना करत याचा आनंद साजरा केला. तितक्यात केएल राहुलने येऊन त्याला मिठी मारत त्याचं कौतुक केलं. बेन डकेटच्या विकेटचा व्हीडिओही सध्या व्हायरल होत आहे. डकेट ९४ धावांवर झेलबाद झाल्याने अवघ्या ६ धावांनी त्याचं शतक हुकलं. बाद होताच खाली मान घालत डकेट निराश झाला.

दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत इंग्लंडने ४६ षटकांत २ बाद २२५ धावा केल्या आहेत. जॅक क्रॉलीने ८४ तर बेन डकेटने ९४ धावांची उत्कृष्ट खेळी केल्या. जो रूट आणि ऑली पोपची जोडी तिसऱ्या दिवशी इंग्लंडच्या डावाला सुरूवात करतील. तर भारताकडून रवींद्र जडेजा आणि अंशुल कंबोज यांनी १-१ विकेट घेतली. भारताकडे पहिल्या डावात आता १३३ धावांची आघाडी आहे.