Virat Kohli Wicket Anushka Sharma Reaction: भारत वि. न्यूझीलंड सामन्यापेक्षा आता विराट कोहली ज्या आश्चर्यकारक पद्धतीने झेलबाद झाला, त्याची अधिक चर्चा होत आहे. विराट कोहली त्याच्या कारकिर्दीतील ३००वा वनडे सामना खेळत आहे. हा विराटचा खास सामना पाहण्यासाठी त्याची पत्नी बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा उपस्थित आहे. याचबरोबर विराट कोहलीचा भाऊ विकास कोहलीदेखील हा सामना पाहण्यासाठी उपस्थित होता. पण न्यूझीलंडचा क्षेत्ररक्षक ग्लेन फिलिप्सने असा जबरदस्त झेल घेतला की सगळेच अवाक् झाले. विराटला झेलबाद झालेलं पाहून अनुष्काने थेट डोक्याला हात लावला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मॅट हेन्रीच्या सातव्या षटकातील चौथ्या चेंडूवर विराटने एक दणदणीत फटका खेळला, पण पापणी मिटते ना मिटते ग्लेन फिलिप्सने २३ मीटरवर अवघ्या ०.६२ सेंकदात एक अनपेक्षित झेल टिपला. विराटने ज्या धारदार पद्धतीने चेंडू मारला ते पाहून या चेंडूवर चौकार मिळणार याची सर्वांनाच खात्री होती, पण फिलिप्सने सर्वांच्याच आशांवर पाणी फेरलं.

फिलिप्सने चेंडू पकडल्यानंतर कोणाचाही यावर विश्वास बसत नव्हता. विराट कोहलीही क्षणभर थांबला. त्याला समजलंच नाही की नेमकं काय झालं. विराट कोहलीच्या विकेटचे आश्चर्य स्टेडियममध्ये बसलेल्या प्रेक्षकांमध्येही दिसले, ज्यांमध्ये अनुष्का देखील होती. मैदानावरील खेळाडूंनी तर फिलिप्सचा झेल पाहून अक्षरश: तोंडावर हात ठेवत आश्चर्य व्यक्त केले. तर फिलिप्सने झेल टिपल्यानंतर मोठ्याने हसत त्याचा आनंद साजरा केला.

विराटची विकेट पडल्यानंतर अनुष्काने आश्चर्याने डोकं धरल्याचा फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्या फोटोंमध्ये ती हसत हसत चकित होत डोक्याला हात लावताना दिसत आहे. चकित झालेली असतानाही विराटच्या विकेटचं दु:ख स्पष्ट दिसत होती. यासह विराट कोहली आपल्या ३००व्या वनडेत १४ चेंडूंचा सामना करत ११ धावा करून बाद झाला.

विराट कोहलीची विकेट हा भारताला तिसरा धक्का होता. याआधी टीम इंडियाला पहिला धक्का शुबमन गिलच्या रूपाने तर दुसरा फटका रोहित शर्माच्या रूपाने बसला होता. ७ षटकांत भारताने अवघ्या ३० धावांत टॉप ऑर्डरच्या तीनही विकेट गमावल्या. पण नंतर श्रेयस अय्यर आणि अक्षर पटेलने भारताचा डाव सावरला.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anushka sharma reaction on virat kohli wicket and glenn philips catch ind vs nz video viral bdg