वृत्तसंस्था, लास वेगास
भारताचा २१ वर्षीय बुद्धिबळपटू अर्जुन एरिगेसीने ऐतिहासिक कामगिरी करताना ‘फ्री-स्टाइल’ बुद्धिबळ स्पर्धेच्या लास वेगास टप्प्यात उपांत्य फेरीत प्रवेश केला. अशी कामगिरी करणारा तो पहिला भारतीय बुद्धिबळपटू ठरला. परंतु, विश्वातील सर्वोत्तम बुद्धिबळपटू म्हणून ख्याती असलेल्या मॅग्नस कार्लसनला पराभूत करणाऱ्या भारतीय ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंदला फॅबिआनो कारूआनाविरुद्ध ३-४ असा पराभव पत्करावा लागल्याने त्याला विजेतेपदाच्या शर्यतीतून बाहेर पडावे लागले.
एरिगेसीने जागतिक क्रमवारीत सातव्या स्थानावर असलेल्या उझबेकिस्तानच्या नोदिरबेक अब्दुसत्तोरोव याच्यावर १.५-०.५ अशा विजय मिळविला. एरिगेसीने पहिला जलदगती डाव जिंकला, दुसरा डाव त्याने बरोबरीत सोडवला. याच वेळी खरे तर डावाचा निर्णय निश्चित झाला. अर्जुनने आपल्या खेळात नियोजनबद्ध चालींवर अधिक भर दिला. सुरुवातीपासूनच लय राखल्याचा त्याला फायदा झाला. दुसऱ्या डावात पांढऱ्या मोहऱ्यांसह खेळणाऱ्या एरिगेसीने अब्दुसत्तोरोवला संधीच दिली नाही. खेळाच्या उत्तरार्धात काही टाळता येणाऱ्या चुका झाल्यामुळे अब्दुसत्तोरोवला अर्धा गुण मिळवता आला. अर्जुनने यापूर्वी साखळी फेरीतील सात डावांत ४ गुणांची कमाई केली होती. यात तीन विजय आणि दोन डाव बरोबरीत सुटले होते.
अर्जुनने यापूर्वी २८०० एलो गुणांची कमाई केली आहे. या आधुनिक बुद्धिबळ प्रकारातील एकूण क्रमवारीसाठीदेखील या विजयाने अर्जुनची गुणसंख्या वाढणार आहे.
अन्य लढतीत लेव्हॉन अॅरोनियनने अमेरिकेच्या हिकारू नाकामुरा आणि हॅन्स मोके निमन याने उझबेकिस्तानच्याच जावोखिर सिंदारोव याचा पराभव करून उपांत्य फेरी गाठली. चार सामन्यांत अॅरोनियनने २.५-१.५ फरकाने विजय नोंदवला, तर निमनने ४-२ अशी सहज बाजी मारली. उपांत्य फेरीत एरिगेसी अॅरोनियन, तर निमन कारूआनाशी खेळेल.
स्पर्धेच्या दुसऱ्या गटात जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या मॅग्नस कार्लसन याने भारताच्या विदित गुजराथीवर २-० असा विजय मिळवून आपली लय परत मिळवली. अमेरिकेच्या वेस्ली सो ने याने सॅम्युएल सेव्हियनला १.५-०.५ असे पराभूत केले. लिनियर डोमिंग्वेझ पेरेझने कझाकस्तानच्या बिबिसारा असाउबायेवावर १.५-०.५ असा विजय मिळविला.
प्रज्ञानंद आणि कारूआना यांच्यातील लढत निर्णायक सात डावात झाली. यातील तीन डावांत प्रज्ञानंद आघाडीवर होता. प्रज्ञानंद पहिला डाव जिंकला, दुसरा गमावला आणि सहाव्या गेमपर्यंत अशीच चढाओढ सुरू होती. निर्णायक सातव्या डावात कारूआनाने बाजी मारली. या पराभवामुळे प्रज्ञानंदचे संपूर्ण आव्हान संपुष्टात येत नाही. तो बाद फेरीच्या आणखी एका सेटसाठी खालच्या गटातून खेळेल.