क्रिकेट विश्वचषकामध्ये अनपेक्षितरित्या भारताचे आव्हान संपुष्टात आल्याने क्रिकेट चाहते निराश झाले. मात्र दुसरीकडे इतर अनेक खेळांमध्ये भारतीय खेळाडू चमकदार कामगिरी करत आहेत. याच यादीमध्ये आणखीन एका खास नावाचा समावेश झाला आहे. ते नाव म्हणजे आठ वर्षीय अरुण्यतेश गांगुली. पश्चिम बंगालमधील श्रीरामपुर येथील अरुण्यतेशने आंतरराष्ट्रीय स्तरावरील टेबल टेनिस स्पर्धेमध्ये सुवर्ण पदकाची कमाई केली आहे. मॉस्कोमध्ये झालेल्या वर्ल्ड चिल्ड्रेन विनर्स गेम्स २०१९ या स्पर्धेत त्याने सुवर्ण पदक पटकावले आहे. विशेष म्हणजे अवघ्या आठ वर्षाच्या अरुण्यतेशनं कर्करोगासारख्या गंभीर आजारावर मात करत हे सुवर्ण यश संपादित केलं आहे.
कर्करोगासारख्या दुर्धर आजाराशी झुंज देणाऱ्या मुलांसाठी ४ जुलै ते ७ जुलै दरम्यान विशेष स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये ट्रॅक, बुद्धिबळ, फुटबॉल, टेबल टेनिस, जलतरण, रायफल शूटिंग आदी स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेबद्दल अरुण्यतेशची आई कावेरी यांनी अधिक माहिती दिली. ‘स्पर्धेबद्दल तो इतका उत्साही होता की उपचारानंतर झालेला सर्व त्रास तो विसरला,’ असं कावेरी यांनी सांगितले. ‘भारतामधील फक्त दहा मुलांची या स्पर्धेसाठी निवड करण्यात आली होती. त्यातही बंगालमधून केवळ अरुण्यतेशची निवड करण्यात आली होती. त्याने सर्वच्या सर्व सहा खेळांमध्ये भाग घेतला होता,’ अशी माहिती अमिता भाटिया यांनी दिली. भाटिया या अरुण्यतेशवर उपचार करण्यात येणाऱ्या टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये (टीएमएच) बालरोग विभागात काम करतात. अरुण्यतेशला रक्ताचा कर्करोग असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत.
एप्रिल २०१६ मध्ये अरुण्यतेशला रक्ताचा कर्करोग असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर तो उपचारासाठी ११ महिने मुंबईमध्ये वास्तव्यास होता. केमोथेरपीचे उपचार, औषधे यांच्या मदतीने त्याने कर्करोगाशी अडीच वर्ष झुंज दिली आणि ही लढाई जिंकली. डॉक्टरांनी डिसेंबर २००८ अरुण्यतेशने कर्करोगावर मात मिळवल्याचे त्याच्या पालकांना सांगितले. मात्र तरीही त्याला वरचेवर तपासणी आणि चाचण्यांसाठी मुंबईत यावे लागते. कर्करोग पुन्हा होऊ नये म्हणून ही काळजी घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.
अरुण्यतेश मागील दोन महिन्यांपासून स्पर्धेसाठीचा सराव आणि उपचार अशा दोन्ही गोष्टी करत होता. ‘त्याचा दिवस पहाटे साडेपाच वाजता सुरु व्हायचा. सकाळी सहा ते साडेसात दरम्यान तो ट्रॅक आणि फुटबॉलचा सराव करायचा. त्यानंतर तो स्वीमींग, बुद्धीबळ आणि टेबल टेनिसचा सराव करायचा. तर संध्याकाळी तो रायफल शूटिंगच्या क्लासला जायचा’ असं कावेरी यांनी सांगितले.
रायफल शूटिंग शिकण्यासाठी रोज संध्याकाळी तो भाडरेश्वर येथे जायचा. येथील बुल्स आय शुटींग अकॅडमीमध्ये तो प्रशिक्षण घेतो. या अकॅडमीचे प्रमुख पंकज पोतदार यांनी अरुण्यतेशमधील खेळाडू लवकरच हेरला. दुसऱ्याच दिवशी अरुण्यतेशने लक्ष्यभेद केल्यानंतर या मुलामध्ये काहीतरी खास असल्याचे पोतदार यांनी हेरले. ‘हा मुलगा खास आहे. एवढ्या कमी वयात त्याच्यामधील संयम आणि लक्ष्य केंद्रित करण्याची शैली कौतुकास्पद आहे. आम्ही त्याला यापुढेही प्रशिक्षण देण्याचा निर्णय़ घेतला आहे,’ असं पोतदार म्हणाले. पोतदार यांनी अरुण्यतेशला शिकवण्यासाठी कोणत्याही प्रकारचे मानधान घेतले नाही. आता अकॅडमीच अरुण्यतेशसाठी प्रायोजक शोधत असून मॉस्कोमधील स्पर्धेनंतरही त्याचे प्रशिक्षण सुरु ठेवता यावे यासाठी प्रयत्न केले जात आहेत.